अहमदनगर : कर्जमाफी शेतक-यांपर्यंत पोहोचली नाही. कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती आवश्यक आहे. मात्र ही कर्जमुक्ती अद्यापही झालेली नाही. यावर्षी कदाचित शिवसेना राज्यातील सत्तेला लाथ मारू शकेल, असा इशारा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.अहमदनगर येथे गुरुवारी दुपारी सावेडी येथील प्रोफेसर चौकात युवासैनिकांचा मेळावा झाला. या मेळाव्यात ठाकरे म्हणाले, आगामी निवडणुकीनंतर राज्यात एकहाती सत्ता आणायची आहे. त्यासाठी तयार आहात का? असा सवाल ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत आली तर महाराष्ट्राला चांगले दिवस येतील. जीएसटी, नोटबंदीमुळे व्यापार बसला आहे. महाराष्ट्रात कोणीच समाधानी नाही. तरुण, महिला, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी असे सर्वच वर्ग समाधानी नाहीत, हे घालविण्यासाठी परिवर्तन करणे गरजेचे आहे, असे ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी साधला मुक्त संवाद
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. सकाळी साडेदहा वाजता हायस्कूलच्या प्रागणांत ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनीही त्यांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. ठाकरे म्हणाले, आपण कोणत्या वर्गातील आहात. कोणत्या माध्यमातूनशिकत आहात. आपला आवडता विषय कोणता. किती अंतरावरुन शाळेत येत आहेत. सगळ््यांना अभ्यास करणे आवडते का. चांगला समाज घडण्यासाठी चांगल्या शिक्षणाची गरज आहे. कोणी दप्तर आणलेय का, काय आहे दप्तरात, किती मजले चढून जाते. या ओझ्यापासून सुटका करण्यासाठी डिजिटल शिक्षणाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना टॅब वाटल्याचेही त्यांनी सांगितले. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी खेळालाही महत्व दिले पाहिजे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र अभ्यासाचे दडपण घेऊ नका, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.