सुहास पठाडेनेवासा : ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’! हे संताचे पर्यावरणाविषयीच्या विचाराचे पालन करताना वृक्षारोपणाबरोबरच स्वच्छता व निसर्गाचा सांभाळ करण्याचा संदेश देवगडच्या दिंडीच्या माध्यमातून केला जाणार आहे, अशी माहिती देवगड संस्थांनचे महंत ह.भ. प. भास्करगिरी महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नेवासा तालुक्यातील श्री. क्षेत्र देवगड येथील श्री. समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची पायी पालखी दिंडी ही पंढरीच्या वाटेवर स्वच्छता अभियानद्वारे वृक्षारोपण करण्याचा संदेश देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. शिस्तबद्ध दिंडीची ही परंपरा कायम सुरू आहे.दिंडीची परंपरा कधीपासून आहे?भास्करगिरी महाराज : नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांची दिंडी शिस्त पाळत व नियमांचे पालन करत गेल्या ४५ वर्षांपासून वारकऱ्यांना बरोबर घेऊन परंपराची जोपासना करत आहे. या दिंडीत दीड हजार महिला व पुरुषांचा समावेश असतो.दिंडीत शिस्त व नियम कायम आहे. दिंडीच्या व्यवस्थेसाठी पंचवीस वाहने तैनात करण्यात आली आहेत. त्यामध्ये ट्रक, ट्रॅक्टर, जीप, पाणी टँकर अशा वाहनांचा समावेश आहे. दिंडीतील सुरक्षा अधिकारी हे दिंडीवर नियंत्रण ठेऊन असतात. या दिंडीमध्ये शिस्तबद्धपणा व उत्तम नियोजनासाठी सुरक्षारक्षकांकडे वॉकीटॉकीची यंत्रणा दिलेली असते.
दिंडीचे वेळापत्रक कसे असते?भास्करगिरी महाराज : दिंडीमधील सर्व वारकऱ्यांना दिवसासह रात्री विसाव्याची तसेच भोजन व्यवस्थेसाठी स्वयंपाकासाठी आचारी यांची नियुक्ती केली जाते. शिधा देणारे भाविक व्यवस्थापनाकडे वारकºयांना रुचेल-पचेल असा शिधा देतात. तो शिधा भोजनाच्या प्रसाद रूपाने वाटला जातो. मुक्कामी स्थळावर दिंडीतील वारकरी हे पहाटे ३ वाजता उठतात. स्नानासाठी पाण्याच्या टँकरवरच अंघोळीची व्यवस्था केली जाते. यामध्ये स्रियांसाठी ही वेगळी व्यवस्था असते. त्यानंतर सनईवादन, पांडुरंगाचे अभंग, गीतापाठ, काकडा भजन होते. त्यानंतर आरती व सर्वांना चहापान,नाष्ट्याची व्यवस्था केली जाते.
नेवासा-घोडेगाव- नगरपर्यंत रस्ता चांगला आहे. मात्र सोलापूर रस्त्यावर टेंभूर्णी पर्यंत रस्ता खडतर व अरुंद आहे. जड वाहनांना रस्ता मोकळा करत कसरतीने दिंड्यांना पुढे जावे लागते. याच रस्त्यावर अनेक दिंड्या येतात. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होते. यामुळे प्रशासनाने या रस्त्याचे काम लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. -भास्करगिरी महाराज