श्री गोंदा : कुकडी प्रकल्पातील साडेतीन टीएमसी क्षमतेचे येडगाव धरण गुरुवारी रात्री ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून नदीपात्रात ५२२ क्युसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे घोड धरण आता काही तासातच भरू शकते. कुकडी प्रकल्पात सरासरी ६० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मात्र गेल्या वर्षीपेक्षा ३१ टक्के कमी उपयुक्त पाणीसाठा आहे. यामध्ये माणिकडोह पिंपळगाव जोगेमधील पाणीसाठा चिंतेची बाब आहे.
येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७०२ मिलिमीटर इतका एकूण पाऊस नोंदविला गेला आहे. माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४९३ मिलिमीटर इतका पाऊस नोंदविला गेला आहे. धरणात ३ हजार ४७९ एमसीएफटी ३४ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
वडज धरण चार दिवसापूर्वी ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून नदीत ७५२ क्युसेकने विसर्ग चालू आहे. पाणलोट क्षेत्रात ३४२ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.
घोड नदीवरील डिंबे धरण ८४ टक्के भरले आहे. धरणात १० हजार ७४ एमसीएफटी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरण २४ तासात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. पिंपळगाव जोगे धरण पाणलोट क्षेत्रात ७८७ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. मात्र धरणात अवघा २० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पात १६ हजार ६७४ एमसीएफटी पाणीसाठा आहे. म्हणजे ६० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हाच पाणीसाठा २७ हजार ७५ एमसीएफटी म्हणजे ९१ टक्के होता.