भाऊसाहेब येवले । संडे स्पेशल /मुलाखत पतंजली योग समितीच्या माध्यमातून स्वामी रामदेव बाबा यांनी घरोघरी योग-प्राणायम नेण्यात यश संपादन केले. महाराष्ट्रातही खेडोपाड्यापर्यंत योग-प्राणायाम नेण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या माध्यमातून यशस्वी झाला. राज्यात नगर जिल्हा योग प्राणायमात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यात १ हजार १४५ मुख्य योग शिक्षकांनी वाड्यावस्त्यापर्यंत योग प्राणायम नेण्याचा संकल्प केला आहे, असे पतंजलीचे जिल्हा प्रभारी प्रा़ बाळासाहेब निमसे यांनी सांगितले. थंडीचे दिवस सुरू झाले असून नागरिकांचा योगाकडे कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. निमसे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.योग प्रसाराचे काम कसे सुरू आहे?जिल्ह्यात पतंजलीच्या माध्यमातून ५५० योग शिबिरे घेण्यात आले़ स्थायी स्वरूपाच्या जिल्ह्यात ३०० योग कक्षाच्या माध्यमातून योग प्रसार व प्रचाराचे काम सुरू आहे़ एक लाख साधकांनी सहभाग घेऊन आरोग्य चांगले ठेवण्यात यश संपादन केले आहे़ आगामी काळात नगर जिल्हा योगमय होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. योग ही चळवळ झाली का?विशेष म्हणजे योग शिक्षक मोफत प्राणायमचे धडे देत आहेत़ रोगानुसार योग घरोघरी पोहचविण्याची शिक्षकांची धडपड कौतुकास्पद आहे़ त्यामाध्यमातून अनेक साध्य व असाध्य आजार दूर होण्यास मदत झाली आहे़ प्राणायम योगाबरोबरच पतंजलीने प्रत्येक गावात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे़कैद्यांनाही धडे दिले आहेत का?शिक्षक अॅक्युप्रेशरच्या माध्यमातून साधकांना सेवा देत आहेत़ जिल्हा संघटक मधुकर निकम यांनी जेलमध्ये असलेल्या शेकडो कैद्यांना योगाचे धडे देऊन त्यांच्यामध्ये परिवर्तन साधले आहे़ अविनाश ठोकळ व शिक्षकांनी योगाचा जिल्हाभर प्रचार व प्रसार केला आहे़ ६० टक्क्यांपेक्षा अधिक महिलांचा योग प्राणायममध्ये सहभाग आहे़ यासंदर्भात स्वामी रामदेव यांनी नगर जिल्ह्यातील महिलांच्या प्रतिनिधी म्हणून मनिषा लोखंडे यांचा हरिद्वार येथे सत्कार केला होता़युवकांसाठी काय सांगाल?युवा पिढीसाठी प्रत्येक शाळा- महाविद्यालय, शासकीय व निमशासकीय कार्यालय, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींच्या माध्यमातून योग प्राणायमचे धडे दिले आहेत़ औषधी वनस्पतीचे महत्त्व समाजाच्या महत्त्वाच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
पतंजली योग समितीच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा निरोगी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे़ त्यासाठी भारत स्वाभिमान, महिला पतंजली योग समिती, किसान सेवा व युवा भारत हे पाच संघटन कार्यरत आहेत, असे प्रा. बाळासाहेब निमसे यांनी सांगितले.