अहमदनगर : योग हा सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक असून नागरिकांना दररोज योग करावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिन देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नगरकरांनी आणि संपूर्ण जिल्हावासियांनी यात सहभाग नोंदवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. जिल्हा क्रीडा संकुलातील मुख्य कार्यक्रमाबरोबरच तालुकास्तरावरील योगदिनाचे कार्यक्रम आणि प्रत्येक शाळांमध्ये झालेल्या कार्यक्रमात 14 लाखांहून अधिक विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.राज्य शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, विविध शासकीय विभाग यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या सहभागातून या योगदिनाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्यासह आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपमहापौर मालन ढोणे, माजी खासदार दिलीप गांधी, एन. एस. सुब्बाराव आदींची यावेळी उपस्थिती होती.जिल्हा क्रीडा अधिकारी कविता निंबाळकर-नावंदे आणि त्यांच्या सहका-यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि इतर विभागांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. शांतीकुमारजी मेमोरियल फाऊंडेशन, भिंगार अर्बन को-आॅप बँक, अहमदनगर शिक्षक बँक, स्वानंदी हास्य क्लब, आनंद्ऋषीजी राजयोगा मेडीसेंटर, करुणा डायग्नोस्टीक्स, राज्य उत्पादन शुल्क विभाग आदींनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. सव्वा सात वाजता या सामूहिक योगसाधनेस सुरुवात झाली. महावीरनगर मल्लखांब व योगा ट्रेनिंग सेंटरच्या प्रणिता तरोटे, जिल्हा योग संघटनेचे उमेश झोटिंग, इंडियन नॅचरोपॅथी आॅर्गनायझेशनच्या प्रेरणा नांबरिया, श्रीनिवास नांबरिया, पतंजलीचे अविनाश ठोकळ, मनीषा लोखंडे, अंजली गांधी आणि आर्ट आॅफ लिव्हींगचे महेंद्र शिंदे या योगशिक्षकांनी उपस्थितांकडून योग प्रात्यक्षिके करुन घेतली.जिल्हाभरामध्ये विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, एन. एस. एस., एन. सी. सी.,स्काऊट, गाईड, तांत्रिक शैक्षणिक संस्था, नर्सिंग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी त्यांच्या त्यांच्या आस्थापनांमध्ये सहभाग नोंदवला. शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे आणि त्यांच्या त्यांच्या सहका-यांनी यासाठी नियोजन केले.जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी दीपाली बोडके आणि नंदकिशोर रासने, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे आणि विशाल गर्जे यांच्यासह गौरव परदेशी यांनी विविध क्रीडा संस्था व संघटनांच्या सहकायार्ने या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
सुदृढ आरोग्यासाठी रोज योगसाधना करावी : राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 2:06 PM