अहमदनगर : आमच्या रक्तात काँगे्रस आहे़ आम्ही शेवटपर्यंत काँग्रेसचेच काम करु ़तुम्ही आदेश द्या, आम्ही तयार आहोत़ पण साहेब... तुम्ही दोघं अगोदर एकत्र या... सर्व कार्यकर्ते एकत्र येतील, अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यासमोरच काँगे्रसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने १० सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँगे्रसचे जिल्हा कमिटीचे पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची बैठक घेतली़ बैठकीत सर्व तालुकाध्यक्षांनी बंदबाबत काय-काय नियोजन केले आहे किंवा करणार आहात, याची माहिती सांगावी, असे आवाहन विखे यांनी केले होते़ त्यानुसार काही तालुकाध्यक्ष माहिती देत होते़ त्याचवेळी एक तालुकाध्यक्ष उठले आणि त्यांनी जोरदार सूर लावत, आमच्या रक्तात काँगे्रस आहे़ आम्ही शेवटपर्यंत काँगे्रसचे काम करु ़लोकांमध्ये भाजप सरकारविरोधात प्रचंड रोष आहे़ कार्यकर्ते तयार आहेत़ फक्त तुम्ही दोघांनी एक व्हावे, असा सूर आळवत विखे-थोरात मनोमिलनाच्या मुद्याकडे लक्ष वेधले असता विखे यांनी त्या तालुकाध्यक्षाचे बोलणे रोखून आजच्या बैठकीच्या विषयाबाबत बोला, असे सांगितले़ त्यानंतर त्या तालुकाध्यक्षांनी खाली बसून घेतले़ त्यानंतर बोलण्यास आलेल्या तालुकाध्यक्षांनीही पहिल्याच तालुकाध्यक्षांची री ओढली़ विखे यांनीही त्यांना बंद बाबत तुमचे नियोजन सांगा़ भाषणबाजी करण्याची ही वेळ नाही, असे सुनावले़ त्यावर त्या तालुकाध्यक्षांनीही नियोजन चांगले झाले आहे, असे सांगत बोलणे थांबवले़ पाथर्डीचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे यांनी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आम्ही बंद पाळण्याचे नियोजन केले आहे़ मोठी गावे, पेट्रोलपंप, बाजारपेठा बंद ठेवण्याबाबत कळविले आहे़ तसेच तहसीलदारांनाही याबाबत निवेदन दिल्याची माहिती विखे यांना दिली़बैठकीला माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार नंदकुमार झावरे, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, वसंतराव कापरे, जगन्नाथ राळेभात, अंबादास पिसाळ, बाबा ओहळ, उदयसिंह पाटील, उबेद शेख, निखील वारे, हेमंत ओगले, करण ससाणे, सचिन गुजर, राजेंद्र जाधव, संपतराव म्हस्के, डॉ. भास्कर शिरोळे, बाळासाहेब गिरमकर, बाळासाहेब भगदले आदी उपस्थित होते़
तुम्ही एक व्हा... आम्ही तयार आहोत! : विखे-थोरात मनोमिलनासाठी आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 3:08 PM