अहमदनगर : आम्ही आमच्या विकास कामांचे प्रस्ताव आॅगस्टमध्येच दिले होते. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आमचे वाटोळे झाले आहे. आता तरी रखडलेले प्रस्ताव मंजूर करा, अशी कळकळीची विनंती करीत काही विद्यमान नगरसेवकांनी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना पिंगा घातला. मात्र एकही प्रस्ताव आता मंजूर होणार नाही, असे उपायुक्तांनी बजावल्याने नगरसेवकांना हात हलवित जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही.महापालिका निवडणुकीची तयारी करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला आदेश दिला आहे. त्यानुसार महापालिकेची मुदत संपण्याच्या तीन महिने आधीपासून स्वेच्छा निधीतून कामे करण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे काही नगरसेवकांचे स्वेच्छा निधी, तसेच आमदार-खासदारांच्या स्वेच्छा निधीतून कामे करण्याबाबत प्रस्ताव दिले होते. मात्र ते प्रस्ताव महापालिकेत धूळखात पडून राहिले. आॅगस्ट महिन्यात दिलेले प्रस्तावही मंजूर न झाल्याने काही नगरसेवकांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपायुक्त डॉ. पठारे यांच्याकडे आमच्या निधीचे काय?अशी विचारणा केली. ज्या कर्मचाऱ्यांनी प्रस्तावावर काम केले नाही, त्यांच्यावर काय कारवाई करणार? महापालिकेत दप्तर दिरंगाईचा कायदा नाही का? असा सवाल नगरसेवकांनी केला. स्वेच्छा निधीतील एकूण तरतुदीपैकी ५० टक्केच तरतूद खर्च करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली होती. त्यांची ५० टक्के निधीची कामे झाल्यानंतर काही नगरसेवकांनी आमदार निधीतून कामांचे प्रस्ताव दिले होते. त्या प्रस्तावांवर कार्यवाही न झाल्याने नगरसेवक संतापले.नव्या भागातील विकास४नगरसेवकांनी त्यांच्या पूर्वीच्या प्रभागात स्वेच्छा निधीतून कामे केली आहेत. आता नव्याने जोडलेल्या भागासाठी खर्च करण्यासाठी निधी शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे नव्या भागासाठी काही तरी विकास कामे करण्याची अनेकांची इच्छा आहे. नव्या आदेशाने मात्र या संकल्पनेवर पाणी पडले आहे. आता प्रभागातील नव्या भागातील नागरिकांकडे कसे जायचे? अशी चिंता विद्यमान नगरसेवकांना लागली आहे.
तुम्ही आमचे वाटोळे केले : नगरसेवकांचा उपायुक्तांना पिंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 2:51 PM