पारनेर : अळकुटी-निघोज-राळेगण थेरपाळ-गव्हाणवाडी रस्ता कामाबाबत तक्रारी येत आहेत. तुम्ही रस्त्याचे भूमिपूजन केले आहे. रस्ताही दर्जेदार करून घ्या, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना दिला.
पारनेर तालुक्यातून अळकुटी-निघोज-जवळा-राळेगण थेरपाळ -गव्हाणवाडी या मार्गावरील रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत काम सुरू आहे. या कामाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत असून याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडेही तक्रार आली होती.
खासदार डॉ. सुजय विखे, आमदार गिरीश महाजन राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी हजारे यांनी रस्त्याच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. शिवाय विखे यांनी भूमिपूजन केल्याची आठवण करून दिली. रस्ता चांगला झाल्यास त्याचा उपयोग आपल्या भागातील लोकांनाच होणार आहे.
यावेळी विखे म्हणाले, त्या रस्त्याच्या ठेकेदाराला बोलावून घेऊन दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही, असे सांगितले.