सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील ग्रामस्थांना ५ रुपयांत २० लिटर स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच गावात वर्दळीच्या ठिकाणी बाजारतळावर, मध्यवस्तीत गोडाऊनजवळ व संभाजीनगर अशा तीन ठिकाणी प्रत्येकी ६ लाख रुपये खर्चाचे वॉटर फिल्टर बसवण्यात आल्याचे सरपंच मनीषा रोकडे यांनी सांगितले.
सुप्यासह परिसरातील गावातून खासगी व्यावसायिकांद्वारे विकले जाणारे जारचे पाणी प्रतिलिटर जवळपास १ ते दीड रुपया दराने सुपा ग्रामस्थांना घ्यावे लागत होते. मात्र, आता गावातच २५ पैसे प्रतिलिटरने पाणी मिळणार आहे. वॉटर फिल्टर, चार रस्त्यांच्या काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, बांधकाम समितिचे सभापती उमेश परहर, माजी सभापती दीपक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्यासह सुप्यातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावताना ग्रामपंचायतीने ड्रेनेजची व्यवस्था केली आहे. सुप्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांचे काम अपूर्णावस्थेत असून हे काम मात्र दुर्लक्षित राहिले आहे. कोरोनाच्या साथीनंतर तरी ते मार्गी लागेल, अशी अपेक्षा असल्याने या शाळा खोल्या इमारत व आरोग्य उपकेंद्राच्या अपुऱ्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडे यावेळी केली. यावेळी उद्योजक योगेश रोकडे, उपसरपंच सागर मैड, ग्रामपंचायत सदस्य दत्ता पवार आदी उपस्थित होते.