श्रीरामपूर : शहरात गुरुवारी सायंकाळी साई सुपर मार्केट या मुख्य रस्त्यावर असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाला तातडीने साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
मयताचे नाव अभिजीत सुखदरे असे होते. सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान इमारतीच्या वरच्या मजल्यावरून तोल गेल्याने खाली फरशीवर पडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मयत तरुणाचा भाऊ सुजित सुखदरे यांनी अभिजित याचा पोलिसांनी पाठलाग केल्याने बचाव करण्यासाठी तो वरच्या मजल्यावर पळाला व त्याचा मृत्यू झाला असा आरोप केला होता. सायंकाळी येथे काही तरुणांनी गर्दी केल्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी हा प्रकार घडला असे सुजित यांचे म्हणणे होते.
या आरोपाच्या अनुषंगाने श्रीरामपूर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी तपास केला. साई सुपर मार्केट परिसरातील चार सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये पोलीस येथे नियम तोडणाऱ्या तरुणांवर कारवाई करून पावती फाडताना दिसत आहेत. परंतु अभिजीत सुखदरे याच्या मागे पोलीस लागल्याचे कुठेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत नसल्याचे मिटके यांनी शुक्रवारी सांगितले.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.