जामखेड : पहाटे ६ वाजता उठून शौचासाठी घराबाहेर जात असताना घराच्या परिसरात तुटून पडलेल्या वीज वाहक तारेला चिकटून युवकाचा मृत्यू झाला. त्या युवकाला वडील, मोठा भाऊ यांनी ओढण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनाही विजेचा धक्का बसून ते जखमी झाले. ही घटना तालुक्यातील वंजारवाडी येथे शुक्रवारी पहाटे ६ वाजता घडली. याबाबत जामखेड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
योगेश बळीराम जायभाय (वय २३, रा. वंजारवाडी, ता. जामखेड), असे मयताचे नाव आहे. योगेश जायभाय हा पहाटे ६ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे उठून शौचास चालला होता. त्यावेळी घराच्या परिसरातील विद्युत खांबावरील तारा तुटून खाली पडल्या होत्या. खाली पडलेली तार त्याला दिसली नाही. त्याचा तारेवर पाय पडला. शॉक बसला असता तो ओरडला. त्यावेळी त्याचे वडील बळीराम जायभाय व भाऊ गोकुळ यांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांना विजेचा धक्का बसला व ते बाजूला फेकले गेले. यावेळी वडील बळीराम हे बेशुद्ध पडले, तर भाऊ गोकुळ याचा हात भाजला. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या नातेवाइकांनी दोरीच्या साह्याने तार बाजूला करून योगेशला बाजूला करून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. दुपारी उशिरा वंजारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.