घोडेगाव : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील एका शेतातील विहिरीतून वीजपंप बाहेर काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली असून, याबाबत सोनई पोलिसात विहीर मालकासह चौघांविरोधात बुधवारी सकाळी गुन्हा दाखल झाला.
शिवाजी एकनाथ सावंत (वय २६, रा. घोडेगाव, ता. नेवासा) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत मृताचे वडील एकनाथ सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विहीर मालक अशोक नहार, अजय नहार, अभय नहार, एक इतर (सर्व रा. घोडेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवारी सकाळी अशोक नहार याने शिवाजी सावंत याला शेतातील विहिरीतील वीजपंप काढण्यासाठी नेले होते. ट्रॅक्टरला दोर, टायर बांधून पोहता येत नसतानाही शिवाजीला विहिरीत सोडले. त्यात शिवाजी सावंतचा मृत्यू झाला, असे एकनाथ सावंत यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
शिवाजीला विहिरीतून चांदा येथील एका व्यक्तीने बाहेर काढले, नंतर शिंगणापूर फाट्यावरील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तेथे मृतावर अंत्यसंस्कार करा नंतर फिर्याद दाखल करू, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. परंतु, मृताच्या नातेवाईकांनी अगोदर फिर्याद दाखल करून घ्या नंतरच मृतदेह ताब्यात घेऊ, असे सांगितले. शवविच्छेदन होऊनही नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही. अखेर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास फिर्याद दाखल झाल्यावर घोडेगाव येथील अमरधाममध्ये दुपारी दोनच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, तीन लहान मुले असा परिवार आहे.