नेवासा : पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरूणाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील खलाळपिंप्री येथे बुधवारी सकाळी घडली. संदीप बाबासाहेब चोपडे (वय १४) असे या मयत तरुणाने नाव आहे. याबाबत लक्ष्मण मारुती चोपडे (रा.पाचुंदा, ता.नेवासा) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. मूळगाव पाचूंदा (ता.नेवासा) येथे रहात असलेले बाबासाहेब चोपडे हे मेंढपाळ व्यवसाय करीत आहेत. सध्या ते मेंढ्या चारण्यासाठी खलालपिंप्री येथे कुटुंबासोबत रहात आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा संदीप बाबासाहेब चोपडे (वय १४) हा पाणी आणण्यासाठी प्रवरा नदीकाठी गेला होता. पाणी भरताना त्याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला. घटनेची माहिती बाबासाहेब चोपडे यांनी त्यांचे चुलते लक्ष्मण चोपडे यांना दूरध्वनीवरुन दिली. त्यावेळी लक्ष्मण चोपडे व नातेवाईक त्वरित खलाल पिंप्री येथे दाखल झाले. त्यानंतर सर्वांनी संदीपचा शोध घेतला असता मृतदेह प्रवरा नदीत सापडला. मयत संदीप याच्यामागे आई,वडील, एक भाऊ, बहिणी असा परिवार आहे. संदीप याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे नेण्यात आला आहे. याबाबत नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक बबन तमनर करीत आहेत.
प्रवरा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू; नेवासा तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 3:46 PM