लोकमत न्यूज नेटवर्क
पाथर्डी : तालुक्यात तीन गावांची निवडणूक बिनविरोघ झाल्याने ७५ गावांमध्ये ऐन थंडीच्या मोसमात वातावरण तप्त झाले आहे. गावचे सिंहासन ताब्यात घेण्यासाठी बहुतेक गावांमध्ये तरुणाईने स्वतंत्र आघाडी अथवा पॅनल तयार करून ज्येष्ठांना आव्हान दिले आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक पक्षीय पातळीवर लढवली जात नसली तरी तालुक्यातील नेतेमंडळींचे बारीक लक्ष या निवडणुकीवर आहे.
नेतेमंडळींचा थेट हस्तक्षेप नसला तरी आपल्याच विचाराची माणसे निवडून यावीत यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली आहे. आमदार मोनिका राजळे यांचे कासारपिंपळगाव, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे अकोला, समाजकल्याणचे माजी सभापती अर्जुनराव शिरसाट यांचे शिरसाटवाडी याशिवाय माळीबाभूळगाव, जांभळी, येळी, एकनाथवाडी, माणिकदौंडी, पागोरी पिंपळगाव आदी ठिकाणच्या निवडणुका गाजत आहेत.
माळीबाभूळगाव, धामणगाव व शिरसाटवाडी या तीन गावातील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीची बनली आहे. शिरसाटवाडी गावात तीन पॅनल आहेत. यामध्ये मनसेचे युवा नेते अविनाश पालवे, पप्पू शिरसाट निवडणूक लढवित आहेत. येथील निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. उपसभापती मनीषा वायकर यांचे गाव असलेल्या माळीबाभूळगाव ग्रामपंचायतीत दुरंगी लढत असून नेतृत्व उपसभापतींचे पती रवींद्र वायकर करीत आहेत. विरोधी पॅनलने त्यांच्या पुढे कडवे आव्हान उभे केले आहे. माळीबाभूळगावात काही वाॅर्डात चौरंगी लढत होत आहे. वृद्धेश्वरचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांच्या धामणगावात तिरंगी सामना पहायला मिळत आहे.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे गाव असलेल्या अकोल्यात दुरंगी सामना रंगला असून ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. युवा नेते अनिल ढाकणे यांच्या पॅनल विरुद्ध पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, नारायण पालवे यांचे पॅनल अशी दुरंगी लढत पाहावयास मिळत आहे. माणिकदौंडी गणात बारा ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होत आहेत. घाटावर दहा ग्रामपंचायतींमध्ये लढत असून माणिकदौंडी, आल्हनवाडी व जाटदेवळे गावात चुरशीच्या लढती होत आहेत. माणिकदौंडीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तरुणांनी आघाडी निर्माण करून कडवे आव्हान उभे केले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांच्या एकनाथवाडी गावात दुरंगी सामना आहे. याशिवाय येळी, पागोरी पिंपळगाव, दुलेचांदगाव, चिंचपूर इजदे, चिंचपूर पांगूळ, मोहटा आदी ठिकाणच्या निवडणुका गाजत आहेत.
चौकट...
एका मताला हजाराचा भाव..
ग्रामपंचायतीची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने गावोगावी राजकारण चांगलेच तापले आहे. काही ग्रामपंचायतीमध्ये एक हजार रुपये एक मत असा भाव दिला जात असल्याची चर्चा आहे. गावोगावचे धाबे सध्या खचाखच भरलेले आहेत. एकंदरीत गावाचे सिंहासन ताब्यात घेण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात कंबर कसलेली दिसून येत आहे.
चौकट...
कासारपिंपळगावात राजळे विरुद्ध राजळे..
आमदार मोनिका राजळे यांचे कासारपिंपळगाव येथे त्यांच्या जाऊबाई सरपंच मोनाली राजळे या स्वत: रिंगणात आहेत. मोनाली राजळे यांच्या पॅनलच्या विरोधात मोनिका राजळे यांचे चुलत सासरे अर्जुनराव राजळे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. अर्जुनराव राजळे व त्यांच्या सौभाग्यवती याही रिंगणात आहेत. त्यामुळे कासारपिंपळगावची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे.