दहिगाव बोलका : लहान भावंडांनी एका काळविटाला कुत्र्याच्या तावडीतून वाचविले आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे बाबतता शिवारात गुरूवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. काळवीट कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहे.
भोजडे येथील बाबतरा शिवेजवळील बाळासाहेब निवृत्ती वादे यांच्या शेतात गुरूवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान कुत्र्यांनी एका काळविटाचा पाठलाग सुरू केला. बुधवारी रात्री परिसरात पाऊस झाला होता. तर शेतात नांगरट झालेली होती. त्यामुळे काळविटाला पळण्यास अडचण येत होती. त्याचवेळी तेथे वस्तीवर असलेल्या ओंकार बाळासाहेब वादे या इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या लहानग्याला घराच्या ओट्यावरून काळविटावर कुत्री हल्ला करीत असलेले दिसले. त्याने त्याचा इयत्ता सहावीमधील असलेला भाऊ सार्थक बाळासाहेब वादे यास बरोबर घेऊन काठी, दगड यांचे सहाय्याने कुत्र्यांना हाकलण्यास सुरूवात केली. यावेळी कुत्रे त्यांच्यावरही धावून यायचे. परंतू या दोघा भावडांनी प्रयत्न करून कुत्र्यांना पिटाळून लावले. यामुळे काळविटाचे प्राण वाचविले.
जखमी काळविटास बाळासाहेब वादे हे वस्तीवर घेऊन आले. जखमी काळविटावर वनरक्षक आर.एन.सांगळे यांनी प्राथमिक उपचार करून या काळविटास बाळासाहेब निवृत्ती वादे यांच्याच वस्तीवर शेळ्यांसोबत ठेवले आहे.