कर्जत : ‘फिर एक बार मोदी सरकार’ हे फक्त बारामतीच्या साहेबांच्या पहिल्यांदा लक्षात आले. त्यामुळेच कर्णधार होणारे माढामधून माघार घेत बारावे गडी झाले. कर्जत-जामखेडला पूर्वी साहेब आले. साहेब गेले. पण कुकडीचे काय? मग लबाडाचे आवतनं कुणाचे? हे लक्षात आल्यामुळेच तुमच्याकडचे (राष्टÑवादीतील) लोक आमच्याकडे आले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नाव न घेता लगावला.अहमदनगर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ कर्जत येथील सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ. सुरेश धस, खा. दिलीप गांधी, सभापती पुष्पा शेळके, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, अंबादास पिसाळ, शांतीलाल कोपनर, अल्लाउद्दीन काझी, अशोक खेडकर, शिवसेनेचे राजेंद्र दळवी, राजेंद्र विखे, बळीराम यादव,पप्पू शहाणे,रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, रासपचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कोठारी, राजेंद्र देशमुख,दादा सोनमाळी, प्रसाद ढोकरीकर,उमेश जेवरे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी यांचा जाहीरनामा म्हणजे कोंबड्यांचा धंदा आहे. त्यांची महाआघाडी नसून महाखिचडी आहे.पूर्वीच्या सरकारला ५० वर्षात जे करता आले नाही, ते आपल्या सरकारने पाच वर्षात देशात करून दाखविले आहे. जो निधी जिल्ह्याला येत होता, तो आपण तालुक्याला देत आहोत. त्यामुळे विकास झपाट्याने होताना दिसतो आहे. चार वर्षात २ हजार ३६४ कोटी रूपयांची मदत शेतकऱ्यांना दिली. तसेच नगर जिल्ह्यात आठ हजार कोटी रूपये राष्ट्रीय महमार्गासाठी दिले. साडे सात हजार कोटी रूपये ग्राम रस्त्यांसाठी दिले. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांना नेस्तनाबूत करण्याचे धाडस मोदींनी दाखविले.
लबाडाचे आवतनं ओळखल्यामुळेच तुमच्याकडचे आमच्याकडे आले : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 4:16 PM