‘एक खोका, नगरकरांना धोका’ अशा घोषणा देत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना घातले हार

By साहेबराव नरसाळे | Published: May 18, 2023 04:46 PM2023-05-18T16:46:01+5:302023-05-18T16:46:25+5:30

बनावट रिपोर्ट प्रकरणातून या रस्त्यांच्या कामात मागील वीस वर्षात झालेला शेकडो कोटींचा भ्रष्टाचार या शहराच्या दयनीय अवस्थेला कारणीभूत असल्याचा आरोप प्रणव मकासरे यांनी केला आहे.

Youth Congress workers put garlands on pits shouting slogans like 'Ek Khoka, Nagarkarana Dhoka' | ‘एक खोका, नगरकरांना धोका’ अशा घोषणा देत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना घातले हार

‘एक खोका, नगरकरांना धोका’ अशा घोषणा देत युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना घातले हार

अहमदनगर: रस्ते घोटाळा प्रकरणातील बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट विषयावरून काँग्रेसकडून विविध अभिनव आंदोलने करण्यात येत आहेत. गुरुवारी (दि.१८) दुपारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झोपडी कॅन्टीन ते गंगा उद्यान रस्त्यावरील खड्ड्यांना हार घालत ‘एक खोका, नगरकरांना धोका’ अशी घोषणाबाजी केली आहे. खड्ड्यांना हार घालत आम्ही मनपा आयुक्त, आमदार, महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, शहर अभियंता, बांधकाम विभागाचे सर्व तथाकथित तज्ञ अभियंते यांना शहराला खड्ड्यात घातल्याबद्दल आणि भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याबद्दल विनम्र अभिवादन केल्याचे शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड यांनी म्हटले आहे.

या आंदोलनात गायकवाड यांच्यासह सुजित क्षेत्रे, शंकर आव्हाड, आकाश आल्हाट, गौरव घोरपडे, प्रणव मकासरे, सरचिटणीस आनंद जवंजाळ, विशाल शिंदे आदींसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गायकवाड म्हणाले, मनपात बनावट रिपोर्ट प्रकरण आणि त्यातून झालेला रस्ता महाघोटाळ्यातील भ्रष्टाचार दडपण्यासाठी रात्रीच्या अंधारात 'तडजोडी' सुरू झाल्या आहेत. यात खोक्यांची भाषा सुरु झाली आहे. त्यामुळेच भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरसेवक, राजकीय पदाधिकारी अलिशान गाड्यांमधून फिरतात. त्यांच्या गाड्यांचे सस्पेन्शन चांगले आहे. पण सामान्य नगरकर अशा महागड्या गाड्या घेऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांच्या पाठीचे मणके खिळखिळे झाले आहेत. नागरिकांच्या पैशांची लूट करून आता तो जिरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भ्रष्टाचाऱ्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शहराला खड्ड्यात घालणाऱ्यांना नगरकर कदापि माफ करणार नाहीत.

बनावट रिपोर्ट प्रकरणातून या रस्त्यांच्या कामात मागील वीस वर्षात झालेला शेकडो कोटींचा भ्रष्टाचार या शहराच्या दयनीय अवस्थेला कारणीभूत असल्याचा आरोप प्रणव मकासरे यांनी केला आहे. दरम्यान, रस्त्यांच्या कामांबाबत किरण काळे यांनी शुक्रवारी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत शहर काँग्रेसचे कार्यकर्ते स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथरा स्थळाजवळ ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. ठरल्याप्रमाणे इन कॅमेरा गुणवत्ता तपासणीसाठी काँग्रेस कार्यकर्ते सज्ज असल्याची माहिती मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी दिली आहे.

Web Title: Youth Congress workers put garlands on pits shouting slogans like 'Ek Khoka, Nagarkarana Dhoka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.