संगमनेर: राज्य शासनाने खासगी विकासकांना गडकिल्ले भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा रविवारी संगमनेरातील तरुणांनी एकत्र येत निषेध केला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते पेमगिरीपर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर शहागडावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करत सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. गड-किल्ल्यांचा पर्यटनस्थळाप्रमाणे विकास करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतल्यावरही त्याला विरोध सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी एका तरुणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा सिंहगड किल्ल्यावरून कडेलोट केला होता. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली होती. त्यामुळे हे किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर भाड्याने देण्यासाठी सरकारने तत्वतः मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयावर प्रचंड टीका झाल्याने सरकारने भूमिका बदलली. त्यानंतरही अनेकांनी या निर्णयाचा निषेध सुरूच ठेवला असून पूजा झोळे नावाच्या तरुणीने प्रतीकात्मक कडेलोट केला आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मूळची करमाळ्याची असणारी पूजा ही पुण्यामध्ये शिक्षण घेत असून ती गडकिल्ले संवर्धन आणि इतर अनेक सामाजिक विषयांवर फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त होत असते.