राहाता : कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुली व त्यांना वाचवण्यासाठी धावलेली त्यांची आई अशा तिघीजणी एकाच वेळेस राहाता येथील कातनाल्यात बुडाल्या. परंतु जवळच असलेल्या तरूणांनी पोहून एका मुलीसह आईला वाचवले. तर दुसरी मुलगी अत्यवस्थ असून, तिला उपचारासाठी शिर्डीला हलवण्यात आले आहे. गुरूवारी दुपारी राहाता येथे ही घटना घडली.राहाता नगरपरिषदेच्या कातनाल्यावर राणी रामसिंग राठोड (वय १२) व पूजा राजू राठोड (वय १२) या दोघी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी यातील पूजा ही पाय घसरुन पाण्यात पडली. त्यामुळे घाबरलेल्या राणीने आरडाओरड करत तिला वाचवण्यसाठी पाण्यात उडी मारली. परंतु पोहता येत नसल्याने दोन्ही मुली बुडू लागल्या. जवळच घरासमोर असलेल्या राणी हिची आई दुर्गा रामसिंग राठोड (वय ४०) हिने मुलींची आरडाओरड ऐकून नाल्याकडे धाव घेतली. मुली बुडत असल्याचे पाहून आईनेही पाण्यात उडी मारली. परंतु या ठिकाणी पाणी खोल असल्याने आईही बुडाली. काही तरूणांनी पाण्यात बुडत असलेल्या या तिघींना पाहिले व तिकडे धाव घेतली. संदीप पगारे, सुभाष मोरे, अमोल थोरात, अंबादास पवार, इनूस शेख, अकिल शेख या तरूणांनी पटापट पाण्यात उड्या मारून दुर्गा राठोड व राणी राठोड यांना बाहेर काढले. परंतु पूजा लांब गेल्याने तिला वाचवण्यास बराच वेळ लागला. परंतु तोपर्यंत ती अत्यवस्थ झाली होती. (वार्ताहर)
बुडणाऱ्या मायलेकीला तरूणांनी वाचवले
By admin | Published: September 18, 2014 11:22 PM