साहेबराव नरसाळेअहमदनगर : पाचेगाव पाणी योजनेतील टेंडर घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग, बांधकाम (दक्षिण व उत्तर) विभागातील ७०० टेंडरची चौकशी जिल्हा परिषदेने सुरु केली आहे़ त्यातील ३०० टेंडरची चौकशी पूर्ण झाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली़पाचेगाव (ता़ नेवासा) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाचेगाव पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती़ १ कोटी ४५ लाख रुपयांच्या या कामासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून आॅनलाईन पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली़ यात एका ठेकेदाराने सर्वात कमी म्हणजे १ कोटी २० लाख रुपये (उणे तीन टक्के) रकमेचे टेंडर भरले होते़ ते आॅनलाईन मंजूरही करण्यात आले़ मात्र, कार्यारंभ आदेश देताना ज्या ठेकेदाराने सहा टक्के जास्त रकमेची निविदा भरली होती, त्या ठेकेदाराच्या नावाने कार्यारंभ आदेश काढण्यात आला होता़ त्यामुळे ठेकेदाराला निविदा रकमेपेक्षा सुमारे ९ लाख रुपये जास्तीचे मिळणार होते़ याबाबत तक्रार आल्यानंतर या टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्यात आली़ त्यात हा टेंडर घोटाळा उघडकीस आला़ अशा प्रकारचे इतरही घोटाळे झाले असल्याची शक्यता गृहीत धरुन जिल्हा परिषदेने मागील एक वर्षात काढलेल्या टेंडरची चौकशी लावण्यात आली आहे़ एका वर्षात हजारो टेंडर काढण्यात आले आहेत़ मात्र, यातील अनेक कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत़ त्यामुळे ज्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत़ अशा कार्यारंभ आदेश दिलेल्या सुमारे ७०० फाईलची चौकशी करण्यात येणार आहे़ त्यापैकी ३०० फाईलची चौकशी पूर्ण झाली आहे़ उर्वरित फाईलची चौकशी पुढील दहा दिवसात पूर्ण होईल, असे सांगण्यात येते़
जिल्हा परिषद : सातशेपैकी तीनशे टेंडरची चौकशी पूर्ण
By साहेबराव नरसाळे | Published: April 13, 2019 1:27 PM