अहमदनगर : नोकऱ्यांमधील खासगीकरण थांबवावे, तसेच २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागण्यांसाठी भारतभरातून आलेल्या कर्मचाऱ्यांनी रविवारी दिल्लीत पेन्शन शंखनाद आंदोलन केले. या आंदोलनात नगर जिल्हा परिषदेचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत.
केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये खासगीकरण सुरू केले आहे. तसेच २००५ पूर्वी विविध विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही, ही पेन्शन सुरू करावी या मागण्यांसाठी देशभरातून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलक एकवटले आहेत. राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष सुभाष कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद मुख्यालयातील ५५ कर्मचारी दिल्लीला गेले आहेत. याशिवाय इतर विभागांचे एक ते दीड हजार कर्मचारी जिल्ह्यातून दिल्लीत दाखल झाले आहेत.
या सर्वांनी दिल्लीमध्ये १ ऑक्टोबरला केंद्र सरकारच्या विरोधात शंखनाद आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष अभय गट, मनोज चोभे, समीर वाघमारे, विकास साळुंखे, सुरज भोजने, आरती शेकडे, कल्पना शिंदे, अनघा कुलकर्णी, संदीप वाघमारे आदींसह ५५ कर्मचारी उपस्थित होते. लाखोंच्या संख्येने आलेल्या कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत जुन्या पेन्शन योजनेची मागणी केली.