अहमदनगर : येत्या १४ जून रोजी ॲानलाईन होणारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा आता लाॅकडाऊन उठल्याने ॲाफलाईन होत आहे. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षापासून सुरू असलेल्या ॲानलाईन सभेला ब्रेक लागणार आहे. विविध विषयांवर चर्चा करता यावी, यासाठी सर्वसाधारण सभा ॲाफलाईनच घ्यावी, अशी मागणी सतत विरोधकांनी लावून धरली होती. अखेर आता जिल्हा प्रशासनानेच सभेला परवानगी दिल्याने प्रत्यक्ष सदस्यांच्या उपस्थितीत सभागृहात सभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषद अधिनियमानुसार दर तीन महिन्यांनी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे. या नियमानुसार येत्या २४ जूनला मागील सर्वसाधारण सभेचा तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यामुळे त्याआधी १४ जूनला जिल्हा परिषद प्रशासनाने सभा आयोजित केली होती. सभेबाबत प्रशासनाने २८ मे रोजी सदस्यांना लेखी कळवले. परंतु तेव्हा जिल्ह्यात लाॅकडाऊन असल्याने प्रशासनाने सभा ॲानलाईन आयोजित केली होती. त्याला विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला होता. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची वेळ येऊ नये म्हणून सत्ताधारी सतत ॲानलाईन सभा घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
दरम्यान, आता जिल्हा परिषद प्रशासनाने १० जून रोजी पुन्हा सदस्यांना कळवून, ऑनलाईनऐवजी ऑफलाईन सभा होणार असल्याची माहिती दिली आहे. ६ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभेला निर्बंध असणार नाहीत, असे म्हटले असल्याने १४ जून रोजी दुपारी १ वाजता होणारी सभा जिल्हा परिषद सभागृहात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत त्याच वेळेत होईल, असे प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे आता गेल्या सव्वा वर्षानंतर सदस्यांना प्रत्यक्ष सभेला उपस्थित राहून चर्चा करता येणार आहे. अनेक सदस्यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे.