अहमदनगर : जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेतला होता. या निर्णयावर गुरूवारी मुंबईत दोन्ही पक्षाच्या संयुक्त बैठकीत शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरील या घडामोडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या राज्यातील सूत्राप्रमाणे ज्या पक्षाचे सदस्य अधिक त्यांना अध्यक्षपद देण्यात येणार असल्याचे यावेळी मान्य करण्यात आले. पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या निवासस्थानी सायंकाळी पाच वाजता दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी मंत्री पिचड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे, काँग्रेसचे निरीक्षक शरद रणपिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, बांधकाम सभापती कै लास वाकचौरे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, जयंतराव ससाणे, सरचिटणीस सोमनाथ धूत, घनश्याम शेलार, जि.प. सदस्य सुनील गडाख आदी यावेळी उपस्थित होते. सुमारे तासभर चालेल्या बैठकीत सुरूवातीला जिल्हा परिषदेचा विषय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्यात येणार आहे. त्याचधर्तीवर जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेस एकत्र येणार आहे. जागावाटपात अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर उपाध्यक्षपद काँगे्रसच्या वाट्याला येणार आहे. हा फॉर्म्युला पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीत वापरण्यात येणार आहे. त्यात अधिक संख्याबळ असणाऱ्या पक्षाचा सभापती होणार आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत निर्णय पक्षाच्या नगर येथे होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे. २१ तारखेला या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. त्यापूर्वी २० तारखेला नगरला आघाडीच्या तिन्ही मंत्र्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव, काँग्रेसकडून उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात येणार असल्याचे अभंग यांनी सांगितले. यावेळी होणाऱ्या बैठकीत मंत्री दोन्ही पक्षाच्या सदस्यांची मते जाणून घेणार आहेत.(प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतील आघाडीवर शिक्कामोर्तब
By admin | Published: September 11, 2014 11:17 PM