कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाल्याने सध्या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ५० पेक्षा जास्त लोकांनी सभेसाठी, सार्वजनिक कार्यक्रमासाठी किंवा लग्नासाठी एकत्र येऊ नये, असे आदेश काढले आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गेल्या वर्षभरापासून सभागृहात सदस्यांच्या उपस्थितीत झालेली नाही. आतापर्यंतच्या सभा ॲानलाइन आयोजित करण्यात आल्या. यात सदस्यांना महत्त्वाच्या विषयावर चर्चा करता येत नसल्याने सभा प्रत्यक्ष सभागृहात आयोजित करावी, अशी मागणी सदस्यांनी सातत्याने केली आहे. त्याचीच दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने दीडशे लोकांच्या उपस्थितीची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे.
---------
मास्क नसल्यास एक हजार दंड
जिल्हा परिषदेत कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून नियम कडक करण्यात आले आहेत. सध्या बाहेर फिरताना मास्क घातलेले नसेल तर ५०० रुपयांचा दंड करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. परंतु यात नियम आणखी कडक करत जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी यांना मुख्यालयात प्रवेश करताना मास्क नसेल तर एक हजार रुपये दंडाची तरतूद करावी. त्यासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्तावही जिल्हा परिषदेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.