अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या दोन्ही प्रवेशद्वारांजवळ बेशिस्त रिक्षांचा गराडा असल्याने जिल्हा परिषदेत जाणाऱ्या-येणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. शिवाय एसटीसह इतर वाहनांनाही अडथळे येत असून वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. परंतु वाहतूक शाखेकडून येथे कधीच कारवाई झाल्याचे दिसले नाही.
जिल्हा परिषद इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते थेट एसटीच्या प्रवेशद्वारापर्यंत रिक्षा बेशिस्तपणे उभ्या करून प्रवाशी भरण्याचे काम रिक्षाचालकांकडून सुरू असते. रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या करून रिक्षाचालक प्रवाशांसाठी आरोळी देत असतात. त्याचवेळी जिल्हा परिषदेत जाण्यायेण्यासाठी अभ्यागत या गर्दीतून कशीबशी वाट शोधत असतात. दुसरीकडे एसटी बसही या रिक्षांना हाॅर्न देत स्थानकात प्रवेश करण्याची कसरत करतात. यातून या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिणामी इतर दुचाकी व चारचाकी प्रवाशांना ताटकळत बसावे लागते.
रिक्षांमुळे होणारी वाहतूक कोंडी सर्वश्रुत असताना वाहतूक पोलिसांकडून कधीच येथे वाहन व्यवस्थापन किंवा बेशिस्त वाहनांवर कारवाई झालेली दिसत नाही. नोकरदार, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, कामगार वर्ग एसटीतून उतरून शहरात जात असताना या वाहतूक कोंडीचा त्यांनाही मोठा त्रास होतो. अनेकदा या कोंडीत बाचाबाचीचे प्रकार होऊन भांडणाचे प्रसंगही झालेले आहेत. परंतु तरीही प्रशासनाने या प्रकारावर ठोस उपाय अद्यापपर्यंत काढलेला नाही.
------
फोटो - ०९रिक्षा
रिक्षांनी चहूबाजूने गराडा घातल्याने जिल्हा परिषदेचे गेट जणू असे बंद झाले आहे.