अहमदनगर : अबालवृध्दांचा लाडका बाप्पा अगदी काही तासांतच घराघरात विराजमान होणार असल्याने अंतिम टप्प्यातील तयारीने वेग घेतला आहे़ विविध आकार आणि वेषातील गणेशमूर्तींचे बाजारात स्टॉल लागले असून, ग्राहकांची गर्दी वाढली आहे़ मागील वर्षी स्व़ बाळासाहेब ठाकरे यांच्या वेषातील गणेश मूर्ती आकर्षणाचा विषय ठरली होती़ तर यावर्षी खंडेरायांच्या वेषातील जय मल्हार गणेशमूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे़ घरगुती ग्राहकांचा छोट्या व आकर्षक मूर्ती खरेदीकडे जास्त कल आहे तर सार्वजनिक मंडळांकडून मोठमोठ्या मूर्तींना मागणी आहे़ श्रीकृष्ण व राम अवतारातील, शेषनागाच्या पाठीवरील, कमळात बसलेली, साईबाबा, तिरुपती बालाजी, शिव-पार्वती, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई तसेच मूषकावर स्वार झालेली अशा विविध आकारातील मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत़ सध्या एका वृत्त वाहिनीवर सुरू असलेल्या जय मल्हार मालिकेतील श्री खंडेरायाच्या वेषातील मूर्ती सर्वांसाठीच आकर्षणाचा विषय ठरली असून, शहरातील विविध कारखान्यातून लहान-मोठ्या अशा सुमारे एक हजार जय मल्हार मूर्ती विकल्या गेल्या आहेत़ तर बालगणेश भक्तांसाठी गाडी चालविणारे, झोपाळ्यात बसलेले व चेंडू खेळणारे गणराया अशा आकारातील मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत़ शहरात गणेशमूर्ती बनविण्याचे १२० कारखाने असून, संपूर्ण जिल्ह्यात ११०० कारखाने आहेत़ १ ते १४ फुटापर्यंत उंची असलेल्या मूर्तींचे २०० रुपयांपासून ते ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत दर आहेत़ (प्रतिनिधी)
जय मल्हारची क्रेझ
By admin | Published: August 27, 2014 11:04 PM