श्रीरामपूर : मला राजकीय पदाची कोणतीही अपेक्षा यापूर्वी व आजही नव्हती, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक सदस्य या नात्याने शिर्डी विश्वस्तपद देऊ केले असता मी ते नाकारले होते. मी एकच मागणी मुख्यमंत्र्याकडे केली होती ती म्हणजे, मला कोणतेही पद नको, पण श्रीरामपूर जिल्हा घोषित करा, अशी प्रतिक्रिया साईबाबा संस्थानचे विश्वस्त प्रतापराव भोसले यांनी निवडीनंतर ‘लोकमत’शी बोलताना दिली़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘श्री साईबाबांची सेवा करण्याचा आदेश दिला आहे. विश्वस्तपद हे स्वीकारावे लागेल’, असे स्पष्ट बजावल्यामुळे मी त्यास संमती दिली आहे, असे भोसले यांनी सांगितले. श्रीरामपुरात राजकारणापासून दूर असलेला व सर्वांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे मला विश्वस्त केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिर्डी संस्थानच्या यापूर्वीच्या विश्वस्त मंडळामध्ये फायनान्सच्या कामाची जबाबदारी कोणावरही नव्हती, तसे पत्रही नव्हते. माझ्या कामाचा व प्रशासनाचा अनुभव यामुळेच मला विश्वस्तपद देऊन फायनान्स या श्रेणीत नियुक्ती केली असल्याचे नमूद केले. शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या घोषणेचे राजपत्र महाराष्ट्र शासनाने शुक्रवारी प्रसिद्ध केले. भोसले यांच्या या निवडीबद्दल भाजपाचे शहराध्यक्ष किरण लुणीया, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. शांतीलाल पाटणी, अनिल भनगडे, अजय डाकले यांनी अभिनंदन केले आहे. (वार्ताहर)
शिर्डी विश्वस्तपदी मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातरच!
By admin | Published: July 30, 2016 12:24 AM