लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : संगमनेर नगर परिषदेच्या हद्दीतील अमरधाम सुशोभीकरण आणि नुतनीकरण कामात टप्पा दोन व तीन मधील कामे निविदा काढण्यापूर्वीच केली असताना स्थळपाहणी अहवाल सादर न करता पुन्हा निविदा काढून फसवणूक करणारे संगमनेर नगर परिषदेचे नगर अभियंता आणि कनिष्ठ अभियंता अशा दोघांविरुद्ध शनिवारी (दि. १७) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी फसवणूक केल्याची तक्रार श्रीरामपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.
राजेंद्र सुतावणे (नगर अभियंता, संगमनेर नगर परिषद), सुर्यकांत गवळी (कनिष्ठ अभियंता, संगमनेर नगर परिषद) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरधाम सुशोभीकरण आणि नुतनीकरण कामासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे संगमनेर शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी तक्रार केली होती. त्यावर चौकशी समिती नेमण्यात आली, मुख्याधिकारी शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सौरभ पाटील यांचा त्यात समावेश होता. तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी चौकशी करत अहवाल सादर केला होता.