अकोला : महानगरातील सहा लाख अकोलेकरांची तहान भागविणाऱ्या महानस्थित काटेपूर्णा धरणात आता केवळ १० एमएमक्युब पाणी शिल्लक राहिले आहे. यातील ०.५ एमएमक्युब पाणी सिंचन आणि वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी सोडण्यात आले; मात्र यातील ६० टक्के पाण्याची नासाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. कारण सदर पाणी नदीच्या पात्रातून सोडल्याने जमिनीने मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेतले. त्यामुळे ०.५ एमएमक्युब पाण्यापैकी ४० टक्के पाणीच उपयोगात आले आहे. अकोलेकरांसाठी राखीव असलेले पंधरवड्यातील पाणी गेले आहे.जर हा पाणीसाठा पाइपलाइनद्वारे सोडला असती तर पाण्याची एवढी नासाडी झाली नसती. आता काटेपूर्णा धरणात जलसाठा कमी शिल्लक राहिल्याने बुस्टर पंपद्वारे पाणी सोडण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तीन बुस्टर विकत घ्यावे लागणार असून, ६५ लाख रुपयांचा खर्च होणार आहे.महानस्थित काटेपूर्णा धरणातील पाण्याचा साठा लक्षात घेता अकोलेकरांना पाच दिवसांआड पाणी दिल्या जात आहे. ४५ डिग्री सेल्स्ीिअसपेक्षा जास्त तापमान असल्याने आणि कायम पाण्याचा उपसा होत असल्याने जमिनीआतील जल पातळी खालाविली आहे. त्यामुळे बहुतांश बोरवेल्स बंद पडले आहेत. शहराची ही स्थिती असताना महापालिका जलप्रदाय विभागद्वारे काळजी घेतल्या जात नसल्याचे चित्र आहे.महानस्थित जल शुद्धीकरण केंद्र येथे बुस्टर पंपांची आवश्यकता आता जाणवत आहे. त्यामुळे बुस्टर पंप खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. यातील दोन बुस्टर पंप कामात येणार एक बुस्टर स्टॅन्डबाय ठेवले जाणार आहे.महान धरणातील ५ वा वॉल्व्ह उघडा पडल्यानंतर ते लावले जाणार आहे. वाढत्या तापमानामुळे कुलर आणि पाण्याचा वापर शहरात वाढला आहे.पाणीटंचाईची स्थिती पाहता महापौर विजय अग्रवाल, मनपा. आयुक्त संजय कापडणीस आणि जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्या नेतृत्वात बुस्टर खरेदी तातडीने होत आहे.