- नितीन गव्हाळे
अकोला: समग्र शिक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. परंतु गत दोन वर्षांपासून शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरावर भर दिला आहे. यंदा ५ हजारावर पालकांनी शाळांमध्ये वापरलेली पाठ्यपुस्तके परत केली. तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाठ्यपुस्तकांची मागणीसुद्धा कमी झाली असून, यावेळेस इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ३८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबांनी गावी स्थलांतर गेले. शेकडो मजूर, कामगार परप्रांत, परजिल्ह्यात परतले. त्यामुळे शेकडो मुलांना शाळा सोडावी लागली. शाळांमधील पटसंख्या घसरली. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत असल्याने, समग्र शिक्षा योजनेंतर्गत यंदा विद्यार्थी संख्या पाहता आणि पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरावर भर दिल्यामुळे यावर्षी पाठ्यपुस्तकांची मागणी २३ हजारांनी कमी झाली आहे. शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार ५ हजार ३६ पालकांनी त्यांच्या पाल्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळांमध्ये आणून दिली. या पाठ्यपुस्तकांचा फेरवापर पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. गतवर्षी समग्र शिक्षा योजनेंतर्गत १ लाख ६० हजार ८७१ शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्येत झालेली घट आणि पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरामुळे इयत्ता पहिली ते आठवीतील १ लाख ३८ हजार २२६ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे. पाठ्यपुस्तक महामंडळाकडून येत्या आठ दिवसांमध्ये पुस्तके पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर ही पुस्तके पंचायत समितीमार्फत शाळांमध्ये पाठविण्यात येणार आहेत.
अशी दिली जाणार पुस्तके
इ. १ ली- १३,९०७
इ.२ री- १४,३९०
इ. ३ री- १४,९५६
इ. ४ थी- १५,६५३
इ. ५ वी- १९,०८९
इ. ६ वी- १९,३४४
इ. ७ वी- २०,४३६
इ. ८ वी- २०,४५१
एकूण शाळा- १,४८८
एकूण विद्यार्थी- १,५७,१९८
२८ जून रोजी विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मजूर, कामगार व नोकरदारांनी स्थलांतर केल्यामुळे शाळांमधील पटसंख्येवर परिणाम झाला आहे. तसेच पाठ्यपुस्तके पुनर्वापरचा उपक्रम सुरू केल्यामुळे यंदा १ लाख ३८ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येतील.
-डाॅ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक
पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराच्या उपक्रमामुळे पाच हजारावर पालकांनी पुस्तके शाळांकडे परत केली. पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जातील. त्यामुळे यंदा आपण पुस्तकांची मागणी कमी नोंदविली. १० जुलैपर्यंत शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण पूर्ण होईल.
-नंदकिशोर लहाने, सहायक कार्यक्रम अधिकारी
समग्र शिक्षा अभियान