अकाेला : शहरवासीयांना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याची अचूक माेजदाद करता यावी या उद्देशातून मनपा प्रशासनाने नळ कनेक्शन अधिकृत करण्याची माेहीम हाती घेतली हाेती. ही माेहीम थंड बस्त्यात सापडली असून, आजराेजी शहरात १ लाख ४४ हजार मालमत्तांची अधिकृत संख्या असताना त्या बदल्यात केवळ ६३ हजार नळ कनेक्शनधारक आहेत. यापैकी ३३ हजार ५५८ नळांना मीटर बसविण्यात आल्यामुळे काेट्यवधी रुपयांच्या पाणीपट्टी वसुलीला ‘ब्रेक’ लागल्याचे समाेर आले आहे. मनपाच्या जलप्रदाय विभागामार्फत अकाेलेकरांना दर तिसऱ्या दिवसआड पाणी पुरवठा केला जाताे. केंद्र शासनाच्या ‘अमृत’अभियान अंतर्गत पाणी पुरवठा वितरण प्रणालीच्या कामासाठी मनपाला ११० काेटींचा निधी प्राप्त झाला असून, मनपाने ८७ काेटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली हाेती. यामध्ये जलवाहिनीचे जाळे बदलणे व शहरात नवीन आठ जलकुंभ उभारण्याच्या कामांचा समावेश आहे. जलवाहिनीचे जाळे टाकताना मालमत्ताधारकांना अधिकृत नळ कनेक्शन देण्याची माेहीम मनपाने राबवली हाेती. आजराेजी मनपाच्या मालमत्ता कर विभागाच्या दप्तरी १ लाख ४४ हजार मालमत्तांची नाेंद असून, अधिकृत नळधारकांची संख्या ६३ हजार आहे. यापैकी केवळ ३३ हजार ५५८ नळधारकांच्या नळाला मीटर लावण्यात आले आहेत. उर्वरित नळधारकांनी अद्यापही अधिकृतपणे नळाला मीटर न लावता पाण्याचा उपसा सुरू ठेवला आहे. अशा नळधारकांना पाणीपट्टीचे देयक दिले जात नसल्यामुळे मनपाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
सहा काेटींची पाणीपट्टी थकीत
जलप्रदाय विभागाकडे पाणीपट्टीची देयके वाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह संगणक तज्ज्ञ उपलब्ध असूनही मध्यंतरी एका खासगी एजन्सीला देयके वाटपाचा कंत्राट देण्यात आला आहे. नळाला लावलेल्या मीटरचे रिडिंग न घेताच सदर एजन्सीने अकाेलेकरांना अव्वाच्या सव्वा दराने देयकांचे वाटप केले. यावर शिवसेनेने आक्षेप घेताच देयके वाटपाची प्रक्रिया ठप्प पडली. प्रशासनाने यावर मार्ग न काढल्याने सुमारे ६ काेटी रुपयांची पाणीपट्टी थकीत असल्याची माहिती आहे.
१६ टक्के पाण्याची गळती
महान येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर शहरातील जलकुंभांपर्यंत पाणी पाेहाेचविल्या जाते. जलकुंभांद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जाताे. यादरम्यान एकूण १६ टक्के पाण्याची गळती हाेते. ही टक्केवारी कमी करण्याची गरज आहे.
७८ हजार नळांना मीटर कधी?
शहरातील ६६ हजार मालमत्ताधारकांकडे अधिकृत नळ कनेक्शन आहेत. उर्वरित ७८ हजार मालमत्ताधारकांना नळ कनेक्शन देण्याची माेहीम मनपा कधी राबविणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.