अकाेला : बाळापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे माेठ्या प्रमाणात फाेफावले असून दहशतवाद विराेधी पथकाने दाेन दिवसात चार ठिकाणी धाडी टाकून तब्बल ३० पेक्षा अधिक जुगारींना अटक केली. त्यांच्याकडून लाखाेंचा मुद्देमाल जप्त केला असून रविवारी पारस येथे छापा टाकून १० जुगारींना अटक केली आहे. त्यामुळे बाळापूर पाेलिसांच्या आशीर्वादाने माेठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू झाल्याचे वास्तव आहे.
पारस येथे माेठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती दहशतवाद विराेधी पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाला मिळाली. यावरुन पथकाने छापा टाकून मोरेश्वर शेषराव सुळकर, नरेश शिवदास चावरिया, पांडुरंग अंबादास साबळे, प्रवीण अशोक चावरिया, सुधाकर शामराव मुळे, मुकेश मारोती तोडगे, संदीप पांडुरंग भातकुले, राजेन्द्र मारोती तायड़े, सतीश गुलाबराव वाघ, गोपाल सरप सर्व रा. पारस यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून राेख रकमेसह ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात अवैध धंदे व क्लब सुरु असल्याची माहिती आहे. पथकाच्या वारंवार कारवाया सुरु असतानाही अवैध धंदे सुरुच असल्याने वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांचे नियंत्रण सुटल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरु झाली आहे. बड्या पदावरील अधिकारी आल्यापासून अवैध धंद्यावर नियंत्रण नसल्याचेही वास्तव आहे.