कारंजा लाड (जि. वाशिम): येथील वर्दळीच्या मेमन जमात खान्यानजिकच्या एका घरात १0 लाखाची धाडसी चोरी झाल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी कारंजा पोलीसांनी रात्री श्वानपथकास पाचारण करून एका संशयीतास ताब्यात घेतले आहे. या घटनेत चोरट्यांनी रोख ३ लाख ५0 हजार रूपये व २५ तोळे सोने असा एकूण ९ लाख ५0 हजार रूपयाच्या ऐवजावर हात साफ केला आहे. प्राप्त माहितीनुसार, येथील मेमन जमात खाण्याजवळ राहणारे मो. फरहान हाजी मो. हारून आकबानी हे अडत व किराणा व्यवसायीक असून ते कामानिमित्त दररोज सकाळीच घराबाहेर पडतात. सोमवारला नित्यनेमाने ते घराबाहेर गेले. तसेच घरातील महिला सुद्धा खाजगी कामानिमित्त चालकासह स्वत:च्या चारचाकी वाहनाने अमरावती गेल्या होत्या. त्यामुळे घरी कुणीही नाही याची भनक चोरट्यांना लागली. दरम्यान या संधीचा फायदा उचलत चोरट्यांनी भरदिवसा दुपारी ३ वाजता सुमारास त्यांच्या घरात शिरुन धाडसी चोरी केली. चोरट्यांनी घरातील गच्चीवरील व्हेंटीलेटरची जाळी तोडून घरात प्रवेश केला व दरवाजा तोडून कपाटातील २५ तोळे सोने व ३ लाख ५0 हजार रुपये रोख असा ९ लाख ५0 हजार रूपयाचा ऐवज लंपास केला. मो. फरहान हे दुपारी ४ च्या सुमारास जेवणासाठी घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्यास निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती पोलीसांना देताच उपविभागीय पोलिस अधिकारी विलास देशमुख व ठाणेदार राजेश मुळे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. वृत्त लिहेपर्यंत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल नव्हता. मात्र रात्री ७.३0 च्या सुमारास पोलीसांनी श्वानपथकास घटनास्थळावर पाचारण केले. श्वानपथकाच्या ईशार्यावर पोलीसांनी एक संशयीत युवकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. संशयीत हा मो.फरहान यांचा नातेवाईक असल्याचे सांगीतले जात आहे.
कारंजात १0 लाखाची घरफोडी
By admin | Published: February 03, 2015 12:05 AM