अकोला : जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या थकीत वीजदेयकांचा भरणा करण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी जिल्ह्यातील पंचायत समितीस्तरावर वितरित करण्यास जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत गुरुवारी मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषदअंतर्गत जिल्ह्यातील अनेक शाळांकडे वीजदेयकांची रक्कम थकीत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या थकीत वीजदेयकांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांना १० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. पंचायत समित्यांकडून थकीत वीजदेयकांचा निधी संबंधित शाळांना वितरित करण्यात येणार आहे. मोफत पाठ्यपुस्तकेवाटप योजनेंतर्गत जिल्ह्यात उपलब्ध पुस्तकांचे वाटप जिल्ह्यातील केंद्रस्तरावर तातडीने करण्याचे निर्देश या सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समिती सदस्य आम्रपाली खंडारे, प्रगती दांदळे, रिजवाना परवीन, वर्षा वजिरे, रंजना विल्हेकर, गणेश बोबडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नवीन शाळा बांधकाम, दुरुस्ती
कामांचा प्रस्ताव तातडीने तयार करा!
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून जिल्हा परिषदअंतर्गत जिल्ह्यातील नवीन शाळा इमारतींचे बांधकाम आणि शाळा दुरुस्तीच्या कामांचा तातडीने तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला या सभेत देण्यात आले. नवीन शाळा इमारतींचे बांधकाम तसेच दुरुस्तीच्या कामांचे जिल्ह्यातील पंचायत समितीस्तरावरून गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून तातडीने प्रस्ताव मागविण्याच्या सूचनाही या सभेत देण्यात आल्या.
.................................................
पैलपाडा येथे इयत्ता
सहावीची तुकडी सुरू करणार!
अकोला तालुक्यातील पैलपाडा येथे इयत्ता सहावीची तुकडी सुरू करण्याचा ठराव शिक्षण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. पैलपाडा येथे विद्यार्थ्यांसाठी इयत्ता सहावीची तुकडी सुरू करण्याची मागणी होती. त्यानुसार, इयत्ता सहावीची तुकडी सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली.