अकोला: येथील मनूताई कन्या शाळेच्या चौदा विद्यार्थिनींनी समाजोपयोगी रोबोट तयार करून मुंबईतील राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत तब्बल तीन पुरस्कार पटकावले. या विद्यार्थिनींची अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे; परंतु अमेरिकेला जाण्यासाठी विद्यार्थिनींची आर्थिक परिस्थिती नाही. ही बाब लक्षात घेऊन पुण्यातील काही रोबोटिक्स तज्ज्ञांनी त्यांच्यासाठी तब्बल दहा लाख रुपयांची रक्कम गोळा केली. अकोल्यात येऊन त्यांनी मनूताई किड्स एन्जल्सला मदतच दिली नाही, तर त्यांना रोबोटिक्सबाबत मार्गदर्शन करून त्यांचे कौतुक केल्याची माहिती लेडीज क्लास होम सोसायटीच्या अध्यक्ष पल्लवी कुळकर्णी यांनी शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.ग्रामीण भागातील आणि अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींनी रोबोटिक्स तज्ज्ञ काजल राजवैद्य यांच्या मार्गदर्शनात रोबोट तयार करून मुंबईतील रोबोटिक्स स्पर्धेत बाजी मारली आणि मनूतार्इंच्या विद्यार्थिनींची अमेरिकेतील स्पर्धेसाठी निवड झाली; परंतु अमेरिकेला जाण्यासाठी २५ ते ३0 लाख रुपये आणायचे कुठून, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला. प्रसारमाध्यमांनीसुद्धा आर्थिक मदतीसाठी आवाहन केले. पुण्यातील राबोटिक्स तज्ज्ञ ख्रिस बॅस्टिअर पिल्लई, प्रकल्पा पिल्लई व स्मिता जिरगाळे यांना ही बाब कळाल्यावर त्यांनी या विद्यार्थिनींसाठी तब्बल दहा लाख रुपयांची मदत गोळा केली आणि दोन दिवसांपासून हे तज्ज्ञ मनूताई कन्या शाळेतील विद्यार्थिनींच्या भेटीला आले आहे. त्यांनी विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन केले आणि आर्थिक मदतीचा हात दिला. यासोबत या तज्ज्ञांसोबत जपान येथे रोबोटिक्स स्पर्धेसाठी जाणारे विद्यार्थी सिफर जिरगाळे, कनिश त्यागराजन, शाश्वत सेखर, मिहिर मिलीनकेरी, मार्गदर्शक वेदांत चौधरीसुद्धा आले आहेत. त्यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या विद्यार्थिनींना आणखी आर्थिक मदतीची गरज असून, समाजातील दानशूर, सामाजिक संस्थांनी मदत करावी, असे आवाहनही संस्थाध्यक्ष पल्लवी कुळकर्णी यांनी केले. पत्रपरिषदेला सुमंगला थत्ते, सचिव विदुला चौधरी, अनिरुद्ध चौधरी, माजी मुख्याध्यापिका डॉ. वर्षा पाठक, मुख्याध्यापिका ऐश्वर्या धारस्कर, पर्यवेक्षक अजय मलिये, अनिल जोशी, सीमा मुळे, अंजली अग्निहोत्री, विजयकुमार भट्टड व अर्जुनकुमार देवरनकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)