अकोला- राज्यातील सर्वच महापालिकांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव जवळपास बारगळल्यात जमा आहे. राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशामुळे अकोला, अमरावती, नागपूरसह राज्यातील दहा महापालिकांच्या क्षेत्र बदलाच्या प्रस्तावांना ब्रेक लागला आहे. राज्यातील १0 महानगरपालिकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ मार्च २0१७ मध्ये संपत आहे. यात बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर, अमरावती, अकोला व नागपूर या महापालिकांचा समावेश आहे. या महापालिकांची निवडणूक फेब्रुवारी २0१७ मध्ये होण्याची शक्यता आहे. ते बघता राज्य निवडणूक आयोगाने या महापालिकांच्या क्षेत्र बदलाबाबत सप्टेंबर २0१६ पर्यंंतच निर्णय घेण्याबाबत सुचित केले आहे. आयोगाने तसा आदेश १0 जुलै २0१५ रोजी काढून, तो सव महापालिका आयुक्तांना पाठविला आहे. या आदेशामुळे महापालिकांच्या हद्दवाढीच्या प्रस्तावांना ब्रेक लागला आहे. विशेषत: अकोला महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे अनेक वर्षांंपासून पडून आहे. शहरालगतच्या २४ पेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा समावेश अकोला महापालिकेत करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच बृहन्मुंबई, अमरावती, नागपूर आदी महापालिकांची हद्दवाढही प्रस्तावित होती. या सर्व दहा महापालिकांकडे त्यांच्या सध्या असलेल्या क्षेत्रात बदल करून हद्दवाढ करण्यासाठी अवघा ११ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. सप्टेंबर २0१६ पूर्वी हद्दवाढीबाबतची प्रक्रिया पूर्ण करणे निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार आवश्यक आहे. या मुदतीत हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य असल्याने तूर्तास तरी महापालिका क्षेत्रालगतच्या ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे.
*मार्च २0१७ मध्ये मुदत संपत असलेल्या महापालिका
बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर.
*२0१७ मध्ये मुदत संपत असलेल्या इतर महापालिका
चंद्रपूर (एप्रिल २0१७), लातूर, परभणी (मे २0१७), भिवंडी, निजामपूर, मालेगाव (जून २0१७), मीरा-भाईंदर (ऑगस्ट २0१७), नांदेड-वाघाळा (ऑक्टोबर २0१७).