लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिला स्वयंसहाय्यता गटांची निर्मिती केली. त्या बचत गटांच्या महिलांना लॉकडाउनच्या काळातही रोजगार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने तब्बल १० हजार मास्क पुरवठा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार बचत गटांच्या महिलांनी सोमवारी या मास्कचा पुरवठा जिल्हा परिषदेला केला आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी गेल्या वर्षी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांची स्थापना केली. त्या गटांना शासनाकडून मिळणारे अनुदानही काही प्रमाणात वाटप केले. त्यानंतर अस्मिता लाल योजनेतून बचत गटांमार्फत सॅनिटरी नॅपकिन्स निर्मितीचाही प्रयत्न करण्यात आला; मात्र त्याची फारशी अंमलबजावणी झाल्याचे पुढे आले नाही. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या हातालाही काम मिळेनासे झाले. या काळात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्या पुढाकाराने महिला बचत गटांना मास्क पुरवठा करण्याचा आदेश देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला लागणाऱ्या एकूण १० हजार मास्कचा पुरवठा उमेद महिला स्वयंसहायता समूहाकडून करण्यात आला. सोमवारी उमेद अभियानाचे व्यवस्थापक अनिल गुंजे यांच्यासमवेत स्वयंसहायता समूहाच्या महिलांनी मास्कचे हस्तांतरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्याकडे केले. जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोट, बार्शीटाकळी तालुक्यातील महिलांच्या स्वयंसाहाय्यता गटांकडून हा पुरवठा झाला आहे. आता पातूर, बाळापूर, अकोला, तेल्हारा या तालुक्यातील महिला स्वयंसहायता समूहांना यापुढे लागणाºया १० हजार मास्कचा पुरवठा आदेश दिला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
महिला बचत गटांकडून खरेदी केले १० हजार मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 10:54 AM