वाशिम - पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात राबविण्यात येणार्या वॉटर कप स्पर्धेत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्यासाठी २ हजार २४ गावांची निवड झाली आहे. आता ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रती गाव पाच व्यक्तीप्रमाणे १0 हजार १२५ व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पाणी फाउंडेशनच्यावतीने वॅटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात शासनाचाही सहभाग असून, या अंतर्गत लोकसहभातून जलसंधारणाची कामे करण्यासाठी राज्यातील ३0 तालुक्यामधील ३ हजार गावांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यापैकी २ हजार २४ गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. आता या गावांतील प्रत्येकी ५ व्यक्ती प्रमाणे १0 हजार १२५ लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या मार्गदर्शनात गावकर्यांच्या सहभागाने जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. या व्यक्तींना पाणी फाउंडेशनच्यावतीने प्रशिक्षण देण्यासाठी विदर्भातील धार्नी आणि वरूड, तर मराठवाड्यातील अंबाजोगाई आणि करजगाव या तालुक्यांत मिळून १९ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या प्रशिक्षण केंद्रापर्यंत येण्यासाठी प्रशिक्षणार्थींना त्याच्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणापासून येण्या-जाण्याचा खर्च देण्यात येणार आहे. प्रशिक्षण चार दिवसांचे असून, या कालावधीत जेवण आणि निवासाचा खर्चही पाणी फाउंडेशन करणार आहे. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे कशी करता येतील, तसेच त्यासाठी लोकसहभाग कसा वाढवायचा, याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाला ४ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्यासाठी एकूण १0 हजार १२५ लोकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्यातील चार तालुक्यात मिळून १९ प्रशिक्षण केंद्र त्यासाठी सुरू करण्यात आली आहेत. या ठिकाणी प्रशिक्षणार्थींच्या निवासाचा आणि जेवणाचा खर्च पाणी फाउंडेशन करणार आहे, तसेच संबंधित प्रशिक्षणार्थीला तालुक्याच्या ठिकाणाहून प्रशिक्षण केंद्रापर्यंतच्या प्रवासाचा पूर्ण खर्चही पाणी फाउंडेशन करणार आहे. -इरफान शेख. मराठवाडा विभागप्रमुख पाणी फाउंडेशन संस्था.
वॉटर कप स्पर्धेसाठी १0 हजार लोकांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2017 1:57 AM