अकोला : अल्पवयीन मुलीला पळवून नेत सतत एक महिना सैलानी येथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यातून मुलगी गरोदर राहिली होती. या प्रकरणात विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. शर्मा यांनी आरोपी युवकास शनिवारी १० वर्षे सक्तमजुरीसह १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
मुलीच्या वडिलांनी १७ जुलै २०१५ रोजी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गणेश गजानन अंजनकर (३२), रा. कृषीनगर, अकोला याने अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन सैलानी येथे एक महिना ठेवले. दरम्यान, तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याने ती गरोदर राहिली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीसह पीडिता मुलीला सैलानी येथून ताब्यात घेतले. मुलगी ट्यूशनला जाते, असे सांगून घरून गेली होती. मुलीच्या वडिलांनी आरोपी व त्याच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला होता. चौकशीदरम्यान पीडितेने तिच्यावर आरोपीने अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारतर्फे एकूण ९ साक्षीदार तपासले.
साक्ष, पुरावा ग्राह्य धरून आरोपीस न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील अन्य एक आरोपी दीपक ओंकार नृपनारायण याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील ॲड. किरण खोत यांनी बाजू मांडली. प्रकरणाचा तपास तत्कालीन पीएसआय संजय मिश्रा यांनी केला होता. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय श्रीकांत गावंडे व प्रिया गजानन शेंगोकार यांनी सहकार्य केले.
विविध कलमान्वये शिक्षाआरोपी गणेश गजानन अंजनकर (३२) याला भादंवि कलम २३५, ३७६ (२) (आय) पोक्सो कलम ४, ६ नुसार १० वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास एक वर्ष साधा कारावास, कलम ३६३ मध्ये ७ वर्षे सक्तमजुरी शिक्षा व पाच हजार रुपये दंड, न भरल्यास एक वर्ष साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा आरोपीस एकत्रित भोगाव्या लागणार आहेत.
आरोपीस आळंदी येथून केली होती अटकआरोपी गणेश अंजनकर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो आळंदी येथे वास्तव्यास असल्याची माहिती एएसआय संजय पाटील यांना मिळाली होती. आरोपीस जुलै महिन्यात आळंदी येथून ताब्यात घेतले होते. तसेच खटला अंतिम टप्प्यात असताना आरोपी न्यायालयात सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले.