अकोला : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी दहा वर्षांच्या सश्रम करावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीस दंडही ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली एक मुलगी नातेवाईकाकडे पोळ्या करण्यासाठी गेली असता आरोपी शिवा लहानु विल्हेकर, वय ३७ वर्ष रा. बोरगांव मंजु याने घराचे दरवाजे बंद करीत मुलीवर २०१७ मध्ये लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शिवा विल्हेकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास बोरगाव मंजू पोलिसांनी करून दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस पी गोगरकर यांच्या न्यायालयाने या खटल्यात ७ साक्षीदार तपासले. तसेच सरकार पक्षाचा पुरावा व डि.एन.ए. रिपोर्ट ग्राहय मानुन न्यायालयाने आरोपी शिवा विल्हेकर याला दोषी ठरवुन १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील ऍड शितल भुतडा यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. तसेच तपास अधिकारी युवराज पांडुरंग उईके यांनी तपास केला होता. सी.एम.एस. अधिकारी प्रिया शेगोकार, सविता कुकडे, कोर्ट पैरवी सतिश हाडोळे यांनी सहकार्य केले.