अकोला : जातीय सलोखा सप्ताहाचे आयोजन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून, या उपक्रमात मंगळवारी पोलीस मुख्यालयामध्ये अकोला पोलीस दलातील १०० पोलीस अंमलदारांनी रक्तदान केले. राज्यभर रक्ताचा तुटवडा असल्याने पोलिसांनी आता रक्तदानासाठी पुढाकार घेतला आहे.
अकोला पोलीस प्रशासनाच्या वतीने १४ ते २६ जून म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनापर्यंत जातीय सलोखा सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा या दृष्टीने सर्व जाती धर्मातील युवकांना सोबत घेऊन अकोला पोलिस दलातील १०० पोलीस अंमलदार यांनी मंगळवारी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराच्या वेळी पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील, श्रीधर गुलसुंदरे उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला डॉ. प्रणव वाकोडे, डॉ. सिमरन शर्मा, डॉ शीतल अवचार, सचिन दांगटे, भांडेकर, जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉ. कुंदन चव्हाण, डॉ. जोशी, भारती पानझाडे, मोहम्मद मुशीर, सोनवणे, नीलेश अरखराव, नागेश यांनी सहकार्य केले.