आकोट : आकोट नगर परिषदेद्वारा राबविण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड व संवर्धन पंधरवड्यांतर्गत आयोजित वृक्षदिंडीत शहरातील १0 हजार शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश दिला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे.. या स्वरांनी अवघे शहर दुमदुमून गेले होते. क्रांतिदिनाच्या स्मृतीपर्वावर पालिकेद्वारा वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. जि.प. हायस्कूलच्या प्रांगणात नगराध्यक्ष सुनीता चंडालिया यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमेचे पूजन व वृक्ष पालखीचे पूजन केले. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी समीर लाठी, विस्तार अधिकारी अरविंद जाधव, सिद्धेश्वर बेराड, श्यामसुंदर भगत आदी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाची शपथ प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर यांनी दिली. सुधाकर पिंजरकर यांनी सूत्रसंचालन केले. वृक्षदिंडीत शहरातील न. प., जि.प., खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी बँडपथक, वृक्षांची घोषवाक्याची फलके, पोस्टर्स, वृक्ष पालखी तथा विविध वेशभूषेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शहरात वृक्ष महतीचा संदेश पोहोचविण्यात ही दिंडी यशस्वी करण्यासाठी सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी विशेष सहकार्य केले.
१0 हजार विद्यार्थ्यांनी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश
By admin | Published: August 10, 2014 7:24 PM