अकोला : अकोला महापालिकेच्या कर वसुली विभागाला ५२ दिवसांत १०१ कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान आहे. यात महापालिकेची यंत्रणा कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.अकोला महापालिकेच्या सीमावर्ती भागात १.४८ लाख मालमत्ताधारक आहेत. त्यांच्याकडून महापालिका प्रशासन केवळ ३३ कोटी ७७ लाख २ हजार ७३४ रुपये वसूल करू शकले आहे. आता अलीकडच्या आर्थिक वर्षाच्या आत म्हणेज ५२ दिवसांत १०१ कोटी ५७ लाख ३२ हजार ७०१ रुपये वसुलीचे उद्दिष्ट मनपाच्या कर वसुली विभागासमोर आहे. सध्या केवळ दर दिवसाला पाच लाख रुपयांची वसुली महापालिकेची यंत्रणा वसूल करीत आहे. यंदाच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ६८ कोटी ५८ लाख ७९ हजार २४३ रुपये आहे. यापैकी केवळ २२ कोटी ८ लाख ७१ हजार ६७१ रुपये महापालिकेची यंत्रणा वसूल करू शकली. टक्केवारी पाहिली असता, केवळ २४.९५ टक्के वसुली झाली आहे. दरम्यान, वसुलीच्या मुद्यावर विरोधी पक्षाने न्यायालयात याचिका दाखल केल्याने महापालिकेची कर वसुली वादात सापडली आहे. अकोला महापालिकेचे सीमा वाढण्याआधी १ लाख मालमत्ताधारक होते. आता महापालिका प्रशासन कमी वेळात कर वसुलीचे उद्दिष्ट कसे पूर्ण करतात, यासाठी काय नवीन मोहीम उघडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.