अकोला : महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा जनाता दरबार दर सोमवार ऐवेजी मार्च महिन्याच्या पहिल्या शनिवारी रोजी घेण्यात आला. या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आज विविध विभागाच्या एकुण १०४ तक्रारी प्राप्त झाल्या. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे आदींसह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
विभाग प्रमुखांनी प्राप्त तक्रारीचा सात दिवसाच्या आत आपल्या स्तरावर आढावा घ्यावा, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, व्यक्तीगत लाभाच्या योजनासह सर्व शासकीय योजनांची माहिती तसेच यावर्षीचा लक्षांक, केलेली पुर्तता यासंबंधीचे सर्व माहिती विभागप्रमुखांनी बैठकीला येतांना सोबत आणावी असेही ते म्हणाले. विभागाच्या विविध अधिका-यांनी आपल्या विभागाची परिपुर्ण माहिती जनता दरबारात उपस्थित राहतांना सोबत आणावी. नवीन तक्रार कर्त्यांना 15 दिवसात आपल्या तक्रारीवर कार्यवाही होवून त्याबाबत कळविण्यात येईल असा दिलासा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी तक्रार कर्त्यांना दिला. प्रारंभी पालकमंत्री यांनी मागील जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला. या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अुनपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची प्राथमिक माहिती घेवूनच अधिका-यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.
आज झालेल्या जनता दरबारात एकूण १०४ तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामाबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील जनता दरबारातील प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केली.