ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि.05 - आंध्रप्रदेशमधून अवैधपणे राज्यात आणला जाणारा ११ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफिने सापळा रचून जप्त केला. या कारवाईमुळे जिल्हाभरात गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आंध्रप्रदेश मधुन अवैधपणे रस्ते मागार्ने बुधवारला गुटखा आणला जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक हनुमंत गिरमे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधिक्षक स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात गुटखा घेऊन येणारा ट्रक रोखण्यासाठी सहाय्यक पोलीस निरिक्षक किरण साळवे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गजानन कातडे, संजय नंदकुले, स्वप्नील शेळके व रवी घरत यांनी अकोला महामार्गावर सापळा रचला.
पोलीस पथकाने संशयित ट्रकला थांबवून थांबवून तपासणी केली असता त्यात ११ लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. या घटनेची माहिती पोलीसांनी अन्न व औषध प्रशासनाला कळविली. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अजिंठेकर व यादव यांनी वाशिम येथे जप्त केलेल्या ट्रकमधील गुटखा व ट्रक रितसर जप्त केला. जप्त केलेल्या एकुण मुद्देमालाची किंमत ३१ लाख रूपये असल्याची माहिती एपीआय किरण साळवे यांनी दिली. यानंतर वाहन चालकासह संबंधित व्यक्तींवर वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
- वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या डीटेक्शन ब्रँचमधील पथकाला एका ट्रकमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून डीबी पथकाने संशयीत ट्रकचालकाला ट्रकसह पोलीस ठाण्यात आणले होते. ट्रकमधील साहित्य खाली उतरवून तपासणी केली असता त्यामध्ये कुठलीही अवैध वस्तू किंवा खाद्यपदार्थ आढळून आले नाही. मिळालेली माहिती खोटी निघाल्यामुळे डीबी पथकाच्या हाती घोर निराशा आली.