अकोला: जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांवर अतिरिक्त ठरलेल्या १४ प्राथमिक शिक्षकांच्या समयोजनाची प्रक्रिया शुक्रवारी जिल्हा परिषदेत पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये तीन शिक्षकांच्या रिक्त जागांवर समायोजन करण्यात आले असून, उर्वरित ११ खासगी प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांवर १४ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या उपस्थितीत समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये अतिरिक्त ठरलेल्या १४ पैकी तीन शिक्षकांची रिक्त पदे असलेल्या शाळांवर समायोजन करण्यात आले असून, उर्वरित ११ खासगी प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. समायोजन करण्यात आलेले तीन खासगी प्राथमिक शिक्षक नेमणूक करण्यात आलेल्या शाळांवर रिक्त पदांच्या जागेवर रुजू होणार आहेत.अतिरिक्त ११ शिक्षकांचे विभागस्तरावर होणार समायोजन!समायोजन प्रक्रियेत अतिरिक्त ठरलेल्या जिल्ह्यातील ११ खासगी प्राथमिक शिक्षकांचे समायोजन विभागस्तरावरुन करण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत विभागस्तरावरून संबंधित अतिरिक्त खासगी प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.