अकोला: महिनाभरापूर्वी धाडसत्रात पुरवठा विभागाने जप्त केलेला ११ हजार ४३७ क्विंटल हरभरा डाळ, हरभरा व मुगाचा साठा शासन निर्णयाप्रमाणे विक्री करण्याच्या हमीपत्रावर विक्रीसाठी मुक्त करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी गुरुवारी दिला. गत २१ ऑक्टोबर रोजी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात आलेल्या धाडसत्रात एमआयडीसीमधील गोयनका वेअर हाऊसमधील ओमप्रकाश डागा यांच्या ताब्यातील १ हजार ४९२ क्विंटल हरभरा डाळ, ५४५ क्विंटल हरभरा व ३३८ क्विंटल मूग असा एकूण २ हजार ३७५ क्विंटल साठा जप्त करण्यात आला होता. तसेच २४ ऑक्टोबर रोजी चांदूर शिवारातील पाटणी कोल्ड स्टोरेजमधून ९ हजार ६२ क्विंटल हरभरा साठा जप्त करण्यात आला होता. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे संबंधित व्यापार्यांची सुनावणी घेण्यात आली. शासन निर्णयानुसार जप्त करण्यात आलेल्या हरभरा, हरभरा डाळ व मुगाची हमी दराने विक्री करणार असल्याबाबत संबंधित व्यापार्यांनी एक हजार रुपयांच्या हमीपत्रांवर लिहून दिल्यानंतर जप्त करण्यात आलेला एकूण ११ हजार ४३७ क्विंटल साठा विक्रीसाठी मुक्त करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी गुरुवार दिला.
जप्त ११ हजार क्विंटल हरभरा, मुगाचा साठा मुक्त
By admin | Published: December 04, 2015 2:59 AM