अकाेला : अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तब्बल ११ ट्रेडिंग कंपन्यांकडून सुमारे एक काेटी ८७ लाखांचे साेयाबीन खरेदी केल्यानंतर त्याची रक्कम न देता हात वर करणाऱ्या नर्मदा साॅल्वेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचा अधिकृत प्रतिनिधी लक्ष्मी सेल्स कार्पाेरेशन या दाेन कंपन्यांच्या संचालकांविरुध्द रामदास पेठ पाेलिसांनी शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात नर्मदा साॅल्वेक्सचा संचालक शिवकुमार रुहाटीया आणि लक्ष्मी सेल्स काॅर्पाेरेशनचा संचालक शेख जावेद शेख हुसेन कादरी या दाेघांना अटक करण्यात आली आहे. गाैरक्षण राेडवरील सहकार नगर येथील रहिवासी सतीश शांतीलाल जैन यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वडिलाेपार्जित अरिहंत ट्रेडिंग कंपनी नावाचे अडत दुकान आहे. त्यांच्याकडून दरवर्षी नर्मदा साॅल्वेक्सचा संचालक शिवकुमार रुहाटीया आणि त्यांचाच अधिकृत प्रतिनिधी असलेला लक्ष्मी सेल्स काॅर्पाेरेशनचा संचालक शेख जावेद शेख हुसेन कादरी साेयाबीन खरेदी करतात. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील १० अडत्यांकडून त्यांनी तब्बल एक काेटी ८७ लाख ७८ हजार ४९१ रुपयांचे साेयाबीन एप्रिल व मे महिन्यात खरेदी केले. त्यानंतर काेराेनाचे संकट वाढल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले. या कारणामुळे काही दिवस त्यांनी विकलेल्या साेयाबीनचे पैस मागण्यास वेळ केला. मात्र आता ११ अडत्यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली असता लक्ष्मी सेल्स काॅर्पाेरेशनचा संचालक शेख जावेद शेख हुसेन कादरी याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मुख्य खरेदीदार नर्मदा साॅल्वेक्सचा संचालक शिवकुमार रुहाटीया यास पैशाची मागणी केली असता त्यानेही टाळाटाळ केली. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार सतीश जैन यांनी रामदास पेठ पाेलीस ठाण्यात केली. पाेलिसांनी या प्रकरणात दाेन्ही आराेपींसह त्यांच्या साथीदारांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात शिवकुमार रुहाटीया व शेख जावेद शेख हुसेन कादरी या दाेघांना अटक करण्यात आली असून त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़
या अडत्यांची फसवणूक
- अरिहंत ट्रेडिंग कंपनी १० लाख ६९ हजार ९५२ रुपये
- अजय ट्रेडर्स २९ लाख ८८ हजार ६११ रुपये
- सत्यजीत ट्रेडिंग १५ लाख ३५ हजार १०७ रुपये
- आशीर्वाद ट्रेडिंग ३९ लाख ०२ हजार २३२ रुपये
- राेशन ट्रेडिंग ३७ लाख ०५ हजार ६४६ रुपये
- हनुमान ट्रेडिंग २ लाख ४१ हजार ७५६ रुपये
- मालानी ट्रेडिंग ९ लाख ५० हजार ५३३ रुपये
- ए. एम. शिंगरूप ७ लाख ४६ हजार ७०२ रुपये
- जैन ट्रेडिंग १ लाख ६१ हजार ९९२ रुपये
- पुंडलिक ट्रेडर्स १५ लाख २९ हजार ७५७ रुपये
- मानकर ॲण्ड सन्स १९ लाख ४६ हजार २०३ रुपये
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांची फसवणूक करणाऱ्या दाेन कंपन्यांविरुध्द फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवकुमार रुहाटीया आणि शेख जावेद शेख हुसेन कादरी यास अटक करण्यात आली आहे. या दाेन्ही आराेपींसह त्यांच्या साथीदारांचाही लवकरच शाेध घेण्यात येणार आहे़
- विलास पाटील, प्रभारी ठाणेदार, रामदास पेठ पाेलीस स्टेशन, अकाेला
मध्यस्थी ठरली व्यर्थ
या प्रकरणात एका आमदारासह अनेक व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दाेन्ही कंपन्यांचे संचालक केवळ एक काेटी १० लाख रुपये देण्यास तयार झाले. यापेक्षा अधिक एकही रुपया देणार नसल्याची भूमिका या कंपन्यांनी घेतल्यामुळे मध्यस्थांनी आपसात करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर या प्रकरणात शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.