अकोला: पश्चिम विदर्भाचे ट्रामाकेअर सेंटर म्हणून ओळखल्या जाणार्या सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्यसेवेवर वॉच ठेवण्यासाठी सर्वोपचार रुग्णालय परिसरात ११0 सीसी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. वैद्यकीय शिक्षण औषधीद्रव्य विभागाने ११0 सीसी कॅमेरे लावण्यास मंजुरी दिली आहे. सर्वोपचार रुग्णालयात अकोला जिल्हय़ासह अमरावती, वाशिम, बुलडाणा येथील दररोज शेकडो रुग्ण येतात. या रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात की नाहीत, त्यांच्यावर उपचार, औषधोपचार वेळेवर होतो की नाही, त्यांच्याकडे परिचारिका, वैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करतात का, यावर वॉच ठेवण्यासाठी आणि सर्वोपचार रुग्णालयाच्या आरोग्यसेवेत सुसूत्रता आणण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकाराने सीसी कॅमेर्यांसाठीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडे पाठविला होता. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यासाठी पाठपुरावा करून ११0 सीसी कॅमेरे वैद्यकीय शिक्षण औषधीद्रव्य विभागाकडून मंजूर करून घेतले. त्यामुळे लवकर रुग्णालय परिसरासोबतच, रुग्णालयातील ३0 वार्डांमध्ये प्रत्येकी दोन सीसी कॅमेरे, अपघात कक्ष, बाहय़रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अतिदक्षता कक्ष, शल्यगृह आदी विभागांमध्ये सीसी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील मोजक्याच विभागांमध्ये सीसी कॅमेरे लावण्यात आले होते.त्याचे नियंत्रण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या कक्षातून होते. रुग्णांवर होणार्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम डॉ. कार्यकर्ते हे करीत आहेत. यासोबतच रुग्णांवर योग्यप्रकारे उपचार सुरू आहेत का, त्याला वैद्यकीय सुविधा मिळतात की नाही, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी रुग्णांना सेवा देतात की नाही, यावरही अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते हे प्रत्यक्ष लक्ष ठेवत आहेत. रुग्णांना तत्पर आरोग्यसेवा मिळावी यासाठी आणखी ११0 सीसी कॅमेरे लवकरच लावण्यात येणार आहेत. या कॅमेर्यांच्या माध्यमातून परिचारिका व वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच सीसी कॅमेर्यांमुळे परिसरात चालणार्या अवैध धंद्यांना, दलालांना चाप बसणार आहेत.
आरोग्यसेवेवर वॉच ठेवण्यासाठी सर्वोपचारमध्ये लागणार ११0 सीसी कॅमेरे!
By admin | Published: February 24, 2016 1:50 AM