बाळापूर : जिल्हा परिषद उपकर योजनेंतर्गत ९० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य वाटप करण्यात येते. या योजनेसाठी तालुक्यातून १३५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी अर्जाची छाननी केल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता न करणारे ४४० अर्ज हे अपात्र ठरवून ११२८ अर्जाची यादी पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पाठविली आहे. पंचायत समितीकडे अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची सूचना फलकावर लावणे गरजेचे होते ; मात्र पंचायत विभागाने तसे न केल्यानेच ४४० अर्ज अपात्र ठरल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.
जिल्हा परिषदने उपकर योजना सेस फंड मार्फत शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर साहित्य वाटपासाठी पात्र लाभार्थींसाठी अर्ज मागविले होते. शेतकऱ्यांना कागदपत्रांची सूची माहीत नसल्याने अर्ज सादर केले. शेतात विहीर, बोअरवेल नसताना एच.डी. पाईपसाठी अर्ज करणारे ६० अपात्र ठरले, तर अपंग दाखला नसूनही अपंग प्रवर्गात अर्ज करणारे अपात्र ठरले.
----------------------------------------------
तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनुदानावर साहित्य मिळवण्यासाठी पंचायत समितीकडे अर्ज केले. आवश्यक कागदपत्रांची यादी सूचना फलकावर लावणे गरजेची आहे. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी माहिती नसल्याने अर्ज घेताना ते तपासून घेतले असते, तर ४४० अर्ज अपात्र ठरले नसते. प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकरी वंचित राहणार आहेत.
-सागर उपर्वट, सरपंच ग्रा. पं. शेळद.
---------------
यापुढे कुठलेही अनुदान साहित्य वाटप करण्यापूर्वी अर्ज घेताना आवश्यक कागदपत्रांची सूचना फलकावर यादी व आवश्यकता भासल्यास अर्जाची तपासणी करुनच अर्ज स्वीकारले जातील.
- अरुण मुंदडा, कृषी अधिकारी पंचायत समिती बाळापूर.
----------------
लाभासाठी असे केले अर्ज
जिल्हा परिषदेच्या उपकर योजना ९० टक्के अनुदानावर सर्वसाधारण शेतकऱ्यांनी प्लास्टिक ताडपत्रीच्या लाभासाठी अपंग १४ पात्र, सर्वसाधारण शेतकरी ६५४ पात्र, तर २२८ अपात्र अर्ज, एचडी पाईपसाठी २६४ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी १६९ पात्र अपंग ०२, अपात्र ९३. सोयाबीन सेपरेटर १९५ अर्ज शेतकऱ्यांनी केले, त्यापैकी अपंगांसाठी पात्र १६, सर्वसाधारण पात्र ११९, तर अपात्र ६०. बॅटरी ऑपरेटेड पाॅवर स्पेसाठी २६५ शेतकऱ्यांनी अर्ज केले, त्यापैकी अपंगांसाठी १३ अर्ज, सर्वसाधारण पात्र १८६, अपात्र ६६. असे एकूण १,१२८ पात्र अर्जांची यादी मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवली आहे.